#Malshiras:फळवणी हायस्कूल मध्ये सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक पद रिक्त;पालकांचे आमरण उपोषण सुरू
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
फळवणी ता माळशिरस येथे रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय असून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून सेमी च्या 6 व मराठी च्या 6 तुकड्या आहेत.येथे फळवणी, कोळेगाव साळमुख,काळमवाडी,आसबे वस्ती येथून शिक्षणासाठी येणारे एकूण 379 मुले व 359 मुली असे 738 विद्यार्थी आहेत.सदर शिक्षण संस्था फळवणी परिसरात नावजलेली असून कायम इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागत आहे.शिक्षक वर्ग अतिशय मेहनत घेत असून विद्यार्थी आणि पालकांचेही त्यांना सहकार्य लाभत आहे. परंतु मागील सहा महिन्यापासून या शाळेत प्रमुख जबाबदारी असलेले मुख्याध्यापक पद रिक्त असून त्याचबरोबर लिपिक पदी रिक्त असल्याने याबाबत पालकांमधून नाराजीचा सूर उमटला आहे.
संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मुख्याध्यापक व लिपिक पद भरण्यासाठी पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते व पालक जोतीराम आवताडे यांनी फळवणी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयासमोर 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मुख्याध्यापक नसल्याने शाळेची शिस्त बिघडत असून पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.जोपर्यंत मुख्याध्यापक पद भरले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते पालक जोतीराम आवताडे यांनी सांगितले. सदर उपोषणास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे.
Comments
Post a Comment