विद्यार्थीहिताच्या दोन ऐतिहासिक निर्णयांबद्दल मानले विशेष आभार
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोन वेळा सीईटीची संधी आणि मॅनेजमेंट कोट्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ; राज्य शासनाच्या निर्णयामुळे कोकणातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या चिपळूण दौऱ्याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल आमदार निकम यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष आभार मानून अभिनंदन केले.
११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोन वेळा सीईटीची संधी!
राज्यातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी केवळ ३ अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोन वेळा सीईटी परीक्षा घेतली जात होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यंदा आणखी ८ अभ्यासक्रमांचा समावेश करून एकूण ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोन वेळा सीईटी परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, यासाठी परीक्षांचे वेळापत्रकही आगाऊ जाहीर करण्यात आले आहे. आमदार निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने त्यांनी मंत्रिमहोदयांचे आभार व्यक्त केले.
मॅनेजमेंट कोट्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ!
आतापर्यंत मॅनेजमेंट कोट्यातून (संस्थात्मक कोटा) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या प्रश्नावर तोडगा काढत राज्य शासनाने आता मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात निर्माण होणारा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.
या दोन्ही विद्यार्थीहितैषी निर्णयांमुळे राज्यातील, विशेषतः कोकणातील गरीब व होतकरू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ न देणे, या दृष्टीने हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या विद्यार्थीहिताच्या निर्णयांबद्दल आमदार शेखर निकम यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार विनय नातू साहेब, मिलिंदशेठ कापडी, जयंद्रशेठ खाताते, दशरथशेठ दाभोलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments