आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; विविध संस्थांची मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क -
चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास 'निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन' नाव देण्याबाबत नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात चिपळूण शहरातील विविध संस्थांनी आ. शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. तर आ. निकम यांनी शासन-प्रशासनाकडे सातत्यपूर्ण केलेल्या पाठवपुराव्यानंतर शासनाच्या महसूल व वनविभागाने ही मंजुरी दिली आहे. यामुळे विविध संस्थांनी आ. शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
रत्नागिरी जिल्हा वन विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन मंडळामार्फत चिपळूण येथील वन विभाग संकुलात एक आकर्षक आणि अभ्यासपूर्ण असे कलादालन उभारण्यात आलेले आहे. या कलादालनाची संकल्पना, आराखडा व मुळ मांडणी ही जिल्ह्याचे तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक स्व.निलेश विलास बापट यांची होती. स्व.निलेश विलास बापट हे निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव आणि जैवविविधता यांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे समर्पित जीवन जगलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी 'सह्याद्री निसर्गमित्र', 'ग्लोबल चिपळुण' आणि 'आरोही' यासारख्या संस्थांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला होता. भारतभरातील अनेक अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने, तसेच 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' यांचा सखोल अभ्यास, जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन, हजारो विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देणे, विविध वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये सक्रिय सहभाग असे त्यांच्या कार्याचे स्वरूप होते.
यामुळे चिपळुण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कालादालनास "निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन" असे नाव देण्यासाठी अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम चिपळूण, रंजिता फाउंडेशन चिपळूण, नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूण, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण, नगरसेवक निहार कोवळे, परिवर्तन संस्था चिपळूण यांनी आ. शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती.
याची दखल घेऊन आ. शेखर निकम वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे या अनुषंगाने पत्रव्यवहार केला. इतकेच नव्हे तर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. याची दखल घेऊन ना. गणेश नाईक यांनी वनविभागाला तसे निर्देश दिले. यानुसार वनविभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. याची दखल घेऊन शासनाने चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या कला दालनास 'निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन' नाव देण्याबाबत मंजुरी दिली आहे. यासाठी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांची देखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या निर्णयाबाबत चिपळूणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
0 Comments