महादरबार न्यूज नेटवर्क -
पोलाद परिवार अर्थात भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड, जालना (पोलाद स्टील) यांच्या सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथे विनामूल्य थ्रीडी तारांगणाच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.
या उपक्रमात नागेश मेणसे व धनराज मेणसे यांनी विद्यार्थ्यांना थ्रीडी आभासी स्वरूपात सौरमाला व खगोलविश्वाची माहिती देणारी चित्रफीत दाखवली. विद्यार्थ्यांना सौरमालेतील ग्रह, तारे, आकाशगंगा तसेच अवकाशविश्वाची माहिती अत्यंत आकर्षक व वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगण्यात आली.
थ्रीडी तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अवकाशात भ्रमण केल्याचा अनुभव मिळाला. दृश्य, आभासी आणि वैज्ञानिक पद्धतीने खगोलशास्त्र समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह व कुतूहल निर्माण झाले.
पोलाद स्टीलच्या या सामाजिक उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून, अवकाशविश्वाविषयी जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली.
कार्यक्रमासाठी नागेश मेणसे व धनराज मेणसे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील सर, उपमुख्याध्यापक जिलानी आतार सर, वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या वतीने या उपक्रमाचे व आयोजकांचे कौतुक करण्यात आले.
0 Comments