Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun फार्मास्युटिकल संशोधनात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा प्रभावी वापर

सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय हँड्स-ऑन वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 

गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे आणि अहमदाबाद येथील बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'एआयआणि मशीन लर्निंग चा फार्मास्युटिकल संशोधनातील वापर ' या अत्यंत समकालीन विषयावर दोन दिवसीय हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळेचे दि.28 आणि 29 एप्रिल रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना, संशोधकांना व प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगच्या माध्यमातून औषधनिर्मिती, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण आणि संशोधन प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देणे हा होता. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या 2026-27 पासून लागू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमात ए आय आधारित शिक्षणावर दिलेला भर लक्षात घेता, या कार्यशाळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. अहमदाबादस्थित बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था फार्मसी व अलाईड सायन्सेस क्षेत्रात उद्योगाभिमुख व कौशल्याधारित शिक्षणासाठी प्रसिद्ध असून, संशोधन व उद्योग यामधील दरी कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविते. त्यांच्या सहकार्यामुळे या कार्यशाळेला विशेष गुणवत्ता आणि व्यावसायिक दृष्टिकोन लाभला. कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. स्वयंप्रकाश पटेल यांनी मार्गदर्शन केले.

ते फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रातील प्रख्यात अकॅडेमिशियन, संशोधक व पेटंट एजंट असून, आर्टीफिशियल इंटेलिजन्स इन ड्रग डिस्कव्हरी, फॉर्मुलेशन डेव्हलपमेंटआणि प्रेडिक्टीव्ह मॉडेलिंग या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए आय-आधारित ड्रग डिझाईन, एक्सिपिएन्ट कम्पॅटिबिलिटी व सोल्युबिलिटी प्रेडीक्शन यांसारख्या आधुनिक संकल्पनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करण्यात आले. या कार्यशाळेला राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील एम. फार्म चे विदयार्थी, संशोधक व प्राध्यापकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. सहभागींच्या सकारात्मक अभिप्रायातून कार्यशाळेची उपयुक्तता, विषयाची सध्याची गरज आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले. कार्यशाळेमधून सहभागींच्या संशोधन कौशल्यात वाढ होऊन, AI चा वापर करून अधिक प्रभावी, अचूक आणि वेगवान संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळाले.

तसेच, उद्योग-शिक्षण दरी कमी करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शेखर निकम, कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे व उपप्राचार्य प्रा. प्रवीण वाघचौरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक संशोधनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन आणि नियोजनामागे समन्वयक प्रा. भारती तारे यांचे विशेष योगदान लाभले, सह-समन्वयक म्हणून प्रा.प्रणाली दळवी,प्रा.मृणाल करंजकर, प्रा.स्नेहल आयनर आणि प्रा.पारस चव्हाण यांनी प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली. एकूणच, ही कार्यशाळा फार्मास्युटिकल शिक्षण व संशोधन क्षेत्रात ए आय च्या प्रभावी वापरासाठी दिशादर्शक ठरली असून, भविष्यातील संशोधन पद्धतींना नवी दिशा देणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments