महादरबार न्यूज नेटवर्क -
‘माझी शाळा–माझा फळा’ समूह आयोजित पाचवे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दि. २२ ते २४ मे २०२६ या कालावधीत पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात संपन्न होणार आहे. राज्यभरातील अक्षरप्रेमी, सुलेखनकार, चित्रकार व विविध कलावंतांचा सहभाग या संमेलनात राहणार असल्याची माहिती राज्यस्तरीय ‘माझी शाळा माझा फळा’ समूहाचे संयोजक श्री. अमित भोरकडे यांनी दिली.
या संमेलनाच्या माध्यमातून सुलेखन, चित्रकला, रांगोळी, रेखाचित्र, शिल्पकला आदी कलांना प्रोत्साहन देण्यात येणार असून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनात विविध प्रात्यक्षिके, कार्यशाळा, प्रदर्शन व सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षीचा राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला असून राज्यभरातील विविध क्षेत्रांत अक्षरकलेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दि. २२ मे रोजी फलकलेखन व लाईव्ह स्केच प्रात्यक्षिक, फॅब्रिक कॅलिग्राफी आर्ट (कापडी पिशवी व टी-शर्टवरील सुलेखन), अक्षर व गालीचा रांगोळी प्रात्यक्षिक तसेच कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. २३ मे रोजी व्यक्तिचित्र रांगोळी (पोर्ट्रेट), सुलेखन प्रात्यक्षिक व चर्चा तसेच गालीचा रांगोळी रंगसंगती या विषयांवर सत्रे होणार आहेत. तर दि. २४ मे रोजी टायपोग्राफी फलकलेखन फाँट, स्मृतिचिन्ह वाटप, लेखन साहित्य खरेदी-विक्री, राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार वितरण सोहळा व समारोप कार्यक्रम पार पडणार आहे.
संमेलन स्वागताध्यक्ष तथा अध्यक्ष, होप फौंडेशन, महाड येथील मा. श्री. नरेंद्र महाडीक तसेच संमेलनाध्यक्ष तथा मुख्याधिकारी गट-अ, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन येथील मा. श्री. शुभम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनासाठी नोंदणी करण्यासाठी आयोजकांनी ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली असून इच्छुकांनी खालील लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रजिस्ट्रेशन लिंक
नोंदणी फॉर्म -
https://forms.gle/gm95MjAyxT1tWamL6
राज्यभरातील अक्षरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।
0 Comments