महादरबार न्यूज नेटवर्क -
पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर नातेपुते येथील पल्लवी केशव जोरे या महिलेच्या गळ्यातील १ लारव ६० हजार रुपये किमतीचे सोन्याच्या साखळीचे मिनी गंठण, पेंडल व साखळी चोरट्यानी ओढून पलायन केल्याची घटना नातेपुते येथे घडली. संक्राती सणाच्या तोंडावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याने महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेपुते पोलीस ठाणे रोड महादेव गल्ली येथे राहणाऱ्या पल्लवी केशव जोरे वय ३५ वर्ष ह्या पती केशव जोरे व दोन मुली व एक मुलगा यांच्यासोबत राहत असून त्यांचे आदित्य बेकरी या नावाने दुकान आहे त्यावर ते आपला उदरनिर्वाह करतात. व त्याच ठिकाणी त्यांचे रहाते घर आहे. त्या ठिकाणी असणारी बेकरी जोरे हे दररोज सकाळी ७ वाजता उघडतात व रात्री ९ वाजता बंद करतात. सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी बेकरी उघडली होती. पती केशव जोरे हे शिंगणापूर येथे आठवडी बाजारात बेकरीतील माल विकण्यासाठी गेले होते. व दुकानातील ही कामगार सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले होते.
बेकरीच्या दुकानात पल्लवी जोरे ह्या एकट्याच होत्या त्याचा फायदा घेऊन तोंडाला रुमाल बांधलेला पांढरा शर्ट व जीन पॅट घातलेला डोक्यावर उन्हाळी टोपी असणाऱ्या अनोळखी इसम याने पल्लवी जोरे यांना पाच क्रीम रोल मागितले. व कॅरीबॅग ची मागणी केली अनोळखी इसम याने परिसराचा व बेकरीतील अंदाज घेऊन पल्लवी जोरे यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे मिनी गंठण व ८० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दीड तोळ्याचे पेंडल व सोन्याची साखळी ओढून तोडून चोरून पळविले. पल्लवी जोरे त्याच्या पाठीमागे पळत मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु रस्त्यावर कोणीही नव्हते.सदरचा इसम हा नगरपंचायतीच्या रोडने पळत गेला व पुढे थोड्या अंतरावर थांबलेल्या एका इसमाचे मोटारसायकलवर सिनेस्टाईलच्या पद्धतीने बसून धूम ठोकून निघुन गेला.सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे पासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर चोरट्याने ही चोरी केली असल्याने चोरट्यांना आता पोलिसांची कसलीही भीती राहिली नाही. नुकतेच नातेपुते येथील राजेश चंकेश्वरा यांचे वृषभराज ज्वेलर्स मध्यरात्री फोडून ४० तोळे सोने व १३ किलो चांदी चोरट्याने लंपास केली मात्र अध्याप त्या चोरट्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे अशा होणाऱ्या वारंवार चोऱ्यांवर पोलीस यंत्रणा काय तपास करणार चोऱ्या करणाऱ्या चोरांना कधी पकडणार असा सवाल नातेपुते परिसरातील नागरिकांमधून होत आहे. अशा चोऱ्या करणाऱ्या चोरांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
0 Comments