Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेल्या आकांक्षा कदमचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरव

इटली येथे होणाऱ्या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी; सावर्डे संपर्क कार्यालयात शाल, श्रीफळ व फोटो फ्रेम देऊन सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

जिद्द, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी कॅरम खेळात उल्लेखनीय यश संपादन करणारी, ६२ हून अधिक पदकांची मानकरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कॅरमपटू कु. आकांक्षा कदम हिची इटली येथे होणाऱ्या ९ व्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयात तिचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि फोटो फ्रेम देऊन आकांक्षाचा गौरव करण्यात आला.


आकांक्षाने यापूर्वी मालदीव येथे झालेल्या ६ व्या एशियन कॅरम चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने मिळवलेले यश आणि जागतिक स्पर्धेसाठी झालेली निवड ही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी आकांक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलींनीही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवावे, यासाठी आकांक्षाचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी जागतिक स्पर्धेतही आकांक्षा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या सत्कारप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य मंगेश बंडागळे, सागर तांदळे, पंकज पुसाळकर, सचिन साडविलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आकांक्षाचे अभिनंदन करून तिच्या जागतिक स्पर्धेतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीच्या या सुकन्येच्या कर्तृत्वाचा अभिमान संपूर्ण जिल्ह्याला असून, तिच्या पुढील जागतिक यशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments