आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या सामाजिक कार्याची शासनाकडून दखल
महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते विनोद बाळासो रणदिवे यांची अनुसूचित जाती-जमाती जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार तसेच माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या शिफारशीवरून रणदिवे यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विनोद रणदिवे हे गेल्या वीस वर्षांपासून आंबेडकरी व सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये त्यांनी नातेपुते शहर संघटक, युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष अशी विविध पदे सांभाळली असून सध्या ते माळशिरस तालुका युवक आघाडीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
समाजातील अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करत वंचित घटकांच्या हक्कासाठी त्यांनी आवाज उठविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांच्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नियुक्तीची माहिती समजताच सामाजिक, राजकीय व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे रणदिवे यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया विनोद रणदिवे यांनी व्यक्त केली.
0 Comments