Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute वै. मनोहर महाराज भगत यांची परंपरा अखंडित; ५० भाविकांचे दक्षिण भारत तीर्थयात्रेसाठी उत्साहात प्रस्थान


२९ वर्षांची अखंड धार्मिक परंपरा; पाच राज्यांतील प्रमुख देवस्थानांच्या दर्शनासाठी भाविकांचा भक्तीमय प्रवास सुरू

महादरबार न्यूज नेटवर्क -

भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधत वै. मनोहर महाराज भगत यांनी सुरू केलेली दक्षिण भारत तीर्थयात्रेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली जात आहे. ‘एक धाम रामेश्वरम्’ या मुख्य संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण भारत तीर्थयात्रेला दि. ७ मे रोजी पहाटे नातेपुते येथून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. या यात्रेद्वारे दक्षिण भारतातील पाच राज्यांतील प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे.

सन १९९५ मध्ये वै. मनोहर महाराज भगत यांनी या तीर्थयात्रेची मुहूर्तमेढ रोवली. समाजातील शेतकरी, व्यापारी तसेच गोरगरीब भाविकांना विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडावे, हा त्यामागील उदात्त हेतू होता. गेल्या २९ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही धार्मिक परंपरा त्यांच्या पश्चात श्रीकृष्ण महाराज भगत आणि गणेश महाराज भगत श्रद्धेने पुढे चालवत आहेत.

या तीर्थयात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विविध प्रसिद्ध देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवेढा, पंढरपूर, विजापूर, बदामी, बनशंकरी, गोकर्ण महाबळेश्वर, मुरुडेश्वर, उडपी, बेल्लूर, हळेबीड, श्रीरंगपट्टण, म्हैसूर, वृंदावन गार्डन, उटी, मदुराई, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, केरळ, त्रिचनापल्ली, रामेश्वरम् धाम, श्रीरंगम, शिवकांची, विष्णूकांची, तिरुपती बालाजी मंदिर, कालहस्ती, महानंदी, श्रीशैल्यम तसेच हैदराबाद आणि रामोजी फिल्म सिटी येथे भेट देण्यात येणार असून यात्रेची सांगता पुन्हा पंढरपूर येथे होणार आहे.

नातेपुते परिसरासह बारामती, आटपाडी, सांगोला, फलटण, पुणे आणि करमाळा आदी भागांतून सुमारे ५० भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी स्लीपर कोच बसची व्यवस्था करण्यात आली असून भोजन व निवासाचीही उत्तम सोय करण्यात आली आहे.

पहाटे नातेपुते येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तीर्थयात्रेच्या बसचे पूजन करण्यात आले. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानदेव तुकाराम” तसेच “हर हर महादेव”च्या जयघोषात भाविकांनी यात्रेला प्रारंभ केला. ग्रामीण भागातील भाविकांना दक्षिण भारतातील धार्मिक, सांस्कृतिक आणि शिल्पकलेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी या यात्रेमुळे उपलब्ध होत असल्याने सहभागी भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments