महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी आज सुरत येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. सी. आर. पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या जलसंपदा व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहराला कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी व शिव नदी पूर नियंत्रण प्रकल्पासाठी विशेष केंद्रीय निधी मंजूर करण्याची मागणी पुन्हा एकदा मंत्री महोदयांसमोर मांडली. तसेच नदी खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, आधुनिक पूर पूर्वसूचना प्रणाली आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) याबाबत केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य देण्याची विनंती केली.
याचबरोबर राष्ट्रीय जलमार्ग-२८ (दाभोळ–गोवळकोट–चिपळूण) प्रकल्पाच्या प्रगतीबाबतही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीबद्दल आणि पुढील निविदा प्रक्रियेसाठी दिलेल्या गतीबद्दल आमदार निकम यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले.
केंद्रीय मंत्री मा. सी. आर. पाटील यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील या महत्त्वाच्या विषयांची सकारात्मक दखल घेत आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, चिपळूणला कायमस्वरूपी पूरमुक्त करणे आणि राष्ट्रीय जलमार्ग-२८ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे कोकणातील व्यापार, पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळेल.
या भेटीमुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास आणि विकास प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments