Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मितीतील योगदानाबद्दल ज्योत्सना पवार यांचा सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क - आशिष तनपूरे

कात्रज,पुणे येथील हुजूरपागा प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका ज्योत्स्ना पवार यांचा माजी शिक्षण संचालक,बालभारती मराठी समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी तांबे यांच्या हस्ते ट्राॅफी,प्रशस्तीप्रत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पंचक्रोशी प्रकाशन व भाग्यलक्ष्मी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळ सदोबाची वाडी (ता.बारामती) येथील अभिषेक पॅलेस मंगल कार्यालयात पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा सन्मान सोहळा आणि कवी संमेलनात कवींनी सामाजिक, ग्रामीण, शैक्षणिक आणि भावनिक विषयांवर कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

पवार यांनी शिक्षकांसाठी गणित विषयाची मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांसाठी कृतिपुस्तिका, नवीन अभ्यासक्रमासाठी घटक संच निर्मिती तसेच सेतू अभ्यासक्रम निर्मिती या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक,परदेशातील बृहन महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका येथील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका निर्मितीमध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करत आपल्या शैक्षणिक अनुभवाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘ऍक्टिव्हिटी बुक’ निर्मितीमध्येही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

याशिवाय इयत्ता पहिली ते दहावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपेढी निर्मितीमध्ये त्यांनी पुणे डायटच्या अंतर्गत मार्गदर्शक म्हणून लेखन कार्य केले आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका,लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले,ज्येष्ठ साहित्यिक,गट शिक्षण अधिकारी संजय जाधव, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे विशेषाधिकारी मोगल जाधव, ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, बालभारतीचे विशेषाधिकारी संतोष पवार उपस्थित होते. राज्यभरातील साहित्यिक, शिक्षक, कवी, नवोदित लेखक आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments