Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mohol फुले समृद्ध ग्राम योजनेसाठी कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची - डॉ. जी. के. ससाणे


महादरबार न्यूज नेटवर्क -

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे यांनी आज दि. १० जून कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ येथे भेट देऊन केंद्राच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी फुले समृद्ध ग्राम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.


कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर अल निनो चा प्रभाव लक्षात घेवून विविध कृषी उपाययोजनांचा उपक्रम, तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम, शेतकरी प्रशिक्षण तसेच उत्पन्नवाढीसाठी पूरक व्यवसायांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. फुले समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी डॉ. ससाणे यांनी मा. कुलगुरु, डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेनुसार कृषि विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धती (Integrated Farming System) मॉडेल विकसित करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक व्यवसाय व उत्पादन साधनांची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी आदर्श एकात्मिक शेती प्रात्यक्षिक उभारण्यावर त्यांनी भर दिला. तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणासाठी विविध प्रात्यक्षिके, डेमो युनिट्स व तंत्रज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून फिरता निधी निर्माण करण्याबाबतही मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा तसेच विविध प्रकल्प व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी विस्तार शिक्षण संचालनालयाचे कार्यालय अधिक्षक श्री. महेश सुरवसे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. तानाजी वळकुंडे, कृषि विद्या विषयाच्या विषय विशेषज्ञा डॉ. स्वाती कदम, पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी, कार्यक्रम सहाय्यक – प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. तुषार आहिरे, कार्यक्रम सहाय्यक – संगणक श्री. सुयोग ठाकरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री. नरेंद्र जाधव, सपोर्टिंग स्टाफ - हेल्पर श्री. नितीन बागल हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments