वेळापूर येथे शिवसेना ओबीसी आघाडीची बैठक; संघटन बळकटीसह विविध योजनांवर मार्गदर्शन
महादरबार न्यूज नेटवर्क -
शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सेतूची भूमिका बजावली पाहिजे. योजनांचा लाभ मिळालेला नागरिक हाच पक्षाचा खरा दूत ठरतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी केले.
अर्धनारी नटेश्वराच्या पावन नगरी वेळापूर येथे आयोजित शिवसेना ओबीसी आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे हिवरकर पाटील यांनी सांगितले.
समाजातील कोणत्याही घटकाला शिवसेना हा हक्काचा पक्ष वाटला पाहिजे. पदापेक्षा त्या पदावर केलेले कार्य मोठे असते. कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद वाढवून शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी सामाजिक न्याय विभागासह विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना विकासाची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यात सुमारे सात हजार शिलाई मशिन ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमामुळे हजारो महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली असून माळशिरससह करमाळा आणि सोलापूर परिसरातही शिलाई मशिन वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत रामचंद्र ऊर्फ बापूसाहेब लोखंडे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी, तर विशाल मोहिते यांची जिल्हा सोशल मीडिया प्रभारीपदी निवड जाहीर करण्यात आली.
दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माळशिरस तालुका उपप्रमुख व शासकीय कृषी समिती सदस्य तानाजीराव भोळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख, दहेगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments