Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplunसंगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार शेखर निकम यांचा कृती आराखड्यावर भर

“पाण्याचे संकट येण्याआधीच जागे व्हा!” - संगमेश्वरच्या पाणीटंचाईवर आमदार शेखर निकम यांचा पूर्वनियोजनाचा मंत्र; संभाव्य टंचाई निवारण्यासाठी आतापासूनच उपाययोजनांचे निर्देश

 

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

 यंदा पावसाचे कमी झालेले प्रमाण लक्षात घेता संगमेश्वर तालुक्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबवा. पाण्याचा प्रश्न हा जनतेच्या जीवनाशी निगडित असून, त्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले. पंचायत समिती, देवरूख येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीच्या प्रारंभी गटविकास अधिकारी लोकरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीच्या कामकाजाला सुरुवात केली. यावेळी दिवंगत नाना पाटेकर यांना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई, उपलब्ध जलस्रोतांची स्थिती आणि करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार शेखर निकम यांनी पाणीटंचाईकडे केवळ ऐनवेळच्या संकटाच्या दृष्टीने न पाहता, त्यावर पूर्वनियोजनातून कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज अधोरेखित केली. “पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच नियोजन करून नागरिकांना पाण्याची शाश्वत उपलब्धता कशी करून देता येईल, यावर भर द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि टँकर नियोजनाला प्राधान्य- संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. गावांमधील जिवंत व मृत झरे, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि बंद पडलेल्या विहिरींचा शोध घेऊन त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करावी. नद्या, नाले आणि ओढ्यांमधील गाळ काढणे, पाणीसाठा वाढविण्यासाठी वनराई व साखळी बंधारे उभारणे, तसेच उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि जलसंपदा व जलसंधारण विभागाशी संबंधित कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.

लोकप्रतिनिधींकडून गावनिहाय प्रश्नांवर सूचना - जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनी निवे धरणातील पाणीसाठा वाढविणे व पाणी उपलब्धतेबाबत उपाययोजना करण्याची गरज मांडली. जिल्हा परिषद सदस्य नेहा माने यांनी अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला. जिल्हा परिषद सदस्या गीते यांनी चारा लागवड, जलजीवन योजनांची कामे, ग्रामसभा आयोजित करणे आणि विहिरींची दुरुस्ती यासंदर्भात सूचना मांडल्या.

जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देण्यासह पेढांबे आणि कुंभारखाणी येथील पाणीटंचाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. जिल्हा परिषद सदस्य थेराडे यांनी विंधन विहिरींसाठी आवश्यक असलेल्या बक्षीसपत्राच्या अटी शिथिल करण्याबाबत चर्चा केली. कडवई व रांगव येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपातळीवर स्वतंत्र नियोजन करण्याची गरजही यावेळी व्यक्त झाली.

बैठकीत बोअरवेल, बंधाऱ्यांसाठी आवश्यक निधी, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलसाठा वाढविणे, जलजीवन योजनांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे शिफारस करणे आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेणे, अशा विविध पर्यायांवर चर्चा झाली. खासगी टँकरचालकांना पाणीपुरवठ्यासाठी योग्य दर मिळावेत आणि कामातील अनावश्यक अटी शिथिल करण्याबाबतही सूचना मांडण्यात आल्या.

धरणे, बंधारे आणि पाणीपुरवठा योजनांचा आढावा- कुवळेकर यांनी डिंगणी बंधारा व उमरे धरणासंदर्भातील प्रश्न मांडले. पंचायत समिती सदस्य माईन यांनी कसबा परिसरातील गाळ काढणे व बंधारे बांधण्याची आवश्यकता व्यक्त केली. मंगेश बांडागळे यांनी मोर्डे धरणाची तपासणी करून पाणीपातळी कमी होण्याच्या समस्येचा अभ्यास करण्याची सूचना केली. बावा जड्यार यांनी नारडुवे येथील गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीपुरवठा व्यवस्था आणि मिनी बंधाऱ्याबाबत मुद्दे मांडले.

सरपंच मयूर बाष्टे यांनी बंधारे व पाणीपुरवठा योजनांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली, तर त्यानंतर सुरवे यांनी वनक्षेत्राचा आढावा घेताना घटते वनक्षेत्र, लाकूडतोड व वृक्षतोड रोखण्याची आवश्यकता अधोरेखित केली.तसेच गडनदीची दुरुस्ती, बंदिस्त कालवे, पाइपलाइन, कॅनॉल आणि पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती यांसारख्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सरपंच पवार यांनी कातुर्डी पाझर तलावासंदर्भातील प्रश्न मांडला. 

बैठकीत प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही आपले विचार मांडून मार्गदर्शन केले. शेवटी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांना गावपातळीवर पाण्याबाबत जनजागृती करण्यासह उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावाला आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी परस्पर समन्वयातून काम करणे गरजेचे आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, पंचायत समिती सभापती/उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments