महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
महाराष्ट्र पोलीस अंतर्गत यवत पोलीस स्टेशन यांच्या वतीने नागरिकांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. गाव, वस्ती, परिसर किंवा आठवडे बाजारात वैद्यकीय शिक्षण व आवश्यक परवानगी नसताना उपचार करणारे बनावट डॉक्टर, झोलाछाप डॉक्टर तसेच बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, परवानगी नसताना उपचार करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच गावातील आरोग्य केंद्र, दवाखाने किंवा रुग्णालयांमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी, गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूणहत्या यांसारखे कायद्याने प्रतिबंधित प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षित व कायद्याचे पालन करणारा समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी नागरिकांनी ११२ या क्रमांकावर किंवा यवत पोलीस ठाण्याच्या ०२११९-२९८१३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0 Comments