Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplunसरंद गाव येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा एक अनुभव- सौ.आरती मिलिंद दातार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

ह्या आधी काही ना काही कारणाने दरवर्षी माघी गणेशोत्सवाला जायला जमत नव्हते. पण गेली काही वर्षे नियमितपणे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक वेळी सरंद मधून निघताना आग्रह केला जायचा की एकदा जन्माष्टमी उत्सवासाठी नक्की या. प्रत्येक गोष्टींचे योग जुळून यावे लागतात. ह्या वेळी हा योग जुळून आला व जन्माष्टमी उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पूर्ण सप्ताह जाणं शक्य नव्हतं म्हणून मुख्य दिवशी तरी जाऊया असा विचार केला. सकाळी लवकर निघून श्रीकृष्ण आगमन मिरवणूकीच्या  वेळी तिथे पोहोचलो. अतिशय सुंदर रेखीव अशा तुलसी माळांनी सजलेल्या मूर्तीला डोक्यावर घेऊन यायचा मान हा श्री. देवदास गोपाळ  जड्यार  ह्यांचा आहे. वाजतगाजत, गुलाल उधळत, शिस्तबद्ध लयीत नृत्य करत अतिशय सुंदर मिरवणूक काढण्यात आली व मूर्ती मंदिरा जवळ आल्यावर बालगोपालांवर जलाभिषेक करून, फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. औक्षण करून, दुतर्फा हातात दिवे घेऊन उभ्या असलेल्या महिलांच्या स्वागतात भगवान श्रीकृष्णांचे मंदिरात आगमन झाले व गाभाऱ्यात गणपती समोर स्थापना केली गेली. आपला गणपती बाप्पा व लोभस श्रीकृष्ण ह्यांचे एकाच ठिकाणी स्थित असलेले सगुण रूप अतिशय सुंदर दिसत होते. नंतर महेश साठेंच्या घरी सुरेख शिरा खाऊन सर्व मंडळी घरी परतली ती स्नान करून पुन्हा एकदा मंदिरात येण्यासाठी.

रात्री ९.३० पर्यंत सर्व मंडळी मंगलवेष परिधान करून, नटुन सजुन मंदिरात आली कारण आता तर मुख्य कृष्ण जन्माचा सोहळा साजरा होणार होता. बघता बघता मंदिरात गर्दी जमली व ह्या उत्साहपूर्ण वातावरणात आरतीला सुरुवात झाली. तब्बल एक तास चाललेल्या ह्या आरत्या टाळ मृदंग वादनाने खूप रंगल्या व शेवटी मंत्र पुष्पांजलीने सांगता झाली. नंतर मंदिरात जमलेल्या लोकांनी गोविंदा रे गोपाळा नामाचा जयघोष करीत फेर धरून नृत्य केले व संपूर्ण वातावरण कृष्णमय झाले. 

त्या नंतर छोटेखानी बक्षीस वितरण समारंभ मिलिंद दातार यांच्या अध्यक्षतेखाली केला गेला व अध्यक्षिय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसाद व गीता ह्यांच्या हस्ते मुरलीधराची शास्त्रोक्त पूजा संपन्न झाली. कृष्ण जन्माची तयारी झालेली होतीच. श्री. भालचंद्र भास्कर जोशी  ह्यांनी  हरिपाठ पोथी वाचनाला सुरुवात केली व सर्व मंडळींनी शांत बसून श्रवणाचा आनंद घेतला. बरोबर रात्री १२.३० वाजता पोथी पारायण संपन्न झाले, भगवान श्रीकृष्णांचा पाळणा खाली आणण्यात आला, वाद्यांच्या गजरात, टाळ्यांच्या कडकडाटात, फुले उधळत एकच जल्लोष झाला व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सोहळा त्या क्षणी परमोच्च आनंद देऊन गेला. सर्वांना पंचखाद्य, पेढे असे प्रसाद वाटप करण्यात आले व नंतर मंडळी घरी परतली.

दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा मंदिरात भाविकांची गर्दी जमली. फुगड्या, दंड बैठका, काठीवरच्या उड्या, विविध कसरती, खेळ खेळल्या नंतर नामाचा गजर करून श्रीकृष्णाच्या मूर्तीची उत्तरपूजा करण्यात आली  व ह्या वेळी भगवान श्रीकृष्णांच्या अत्यंत आवडत्या काल्याचा प्रसाद सर्वांना दिला गेला व तोही स्वतः श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यां सोबत खात त्याच पध्दतीने. म्हणजे हाताची ओंजळ करुन त्यात दहिकाला घेऊन खाणे. पूजेचा वा देव कार्याचा प्रसाद हा हातात घेऊन खाण्याची प्रथा आहेच पण ओंजळीत प्रसाद घेणे हे देवा प्रती संपूर्ण समर्पण भाव दर्शविणारे, नम्रता, कृतज्ञता भाव व्यक्त करणारे प्रतिक आहे हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे. 

त्या नंतर मूर्ती विसर्जनासाठी बाहेर नेण्यात आली. दहिहंडी फोडून वाजतगाजत मिरवणूक विसर्जनासाठी निघाली व नदीवर विधीवत विसर्जन झाल्यानंतर सर्व मंडळी पुन्हा एकदा मंदिरात आली. 

त्या नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर सुरू असलेल्या ह्या जन्माष्टमी उत्सवासाठी अनेक लोकांनी अथक परिश्रम घेतले आहेत, अनेक हात ह्या वेळी राबले आहेत. सर्व ग्रामस्थांना एकत्र आणणारा हा उत्सव सरंद ग्रामस्थां मधील ऐक्य, सुसंवाद व एकमेकां विषयी असलेल्या आदराची जाणीव करून देत होता. सर्व थरातील लोकं एकोप्याने, निस्वार्थ भावनेने आपल्याला जमेल तसे काम करत भगवंताच्या चरणी आपली सेवा रुजू करून देत होता. हे सर्व बघून खूप आनंद झाला. आजच्या शहरातील बाजारीकरण झालेल्या उत्सवांपुढे हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आलेला उत्सव लोकांना आदर्श जन्माष्टमी उत्सव कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवता येईल. अशा या उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले हि पण त्या जगनियंत्या परमेश्वराची कृपाच आहे ह्यात शंका नाही. ही संधी दिल्याबद्दल सरंद ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते व दरवर्षी असेच भाग्य लाभू दे अशी प्रार्थना करते.

Post a Comment

0 Comments