#Yavat:खंबेश्वर शिक्षण संस्था, खामगाव मध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
नवीन शिक्षण धोरणात अनेक चांगल्या संकल्पना मांडलेल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास करणे व त्याचे भवितव्य उज्ज्वल घडणे शक्य आहे. परंतु त्यासाठी शिक्षकांची मनोभूमिका बदलणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका या धोरणाच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाची असणार आहे,"असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अ ल देशमुख यांनी केले.


खामगाव,ता. दौंड, जि. पुणे येथे खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधील शिक्षकांची
नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकांची भूमिका याविषयी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री माणिकराव नागवडे, कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे,सचिव विकास जगताप, मुख्याध्यापक श्री नेवसे व अन्य पदाधिकारी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य श्री प्रसेनजीत फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी, समाज परिवर्तनाच्या कार्यात शिक्षकांचा सक्रिय सहभाग परिवर्तनाची गती वाढवणारा ठरतो, असे प्रतिपादन श्री भिमाले यांनी केले. तर शिक्षण संस्थांच्या अशा छोट्या छोट्या प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या नवनवीन योजना कार्यान्वयीत होतील व अशा योजनांमुळेच विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास होण्यास नक्कीच मदत होईल.त्यामुळे अशा कार्यशाळा आयोजित करणारे संस्थाचालक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन श्री प्रसेनजीत फडणवीस यांनी केले.

विविध सत्रांमध्ये विविध वक्त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

शिक्षकी पेशा सोडून DICCI च्या व्यावसायिक वातावरणात आपला ठसा उमटवणाऱ्या सौ. सीमा कांबळे यांनी, नवीन शिक्षण धोरणातील पंचकोष विकास या संकल्पनेची स्पष्टता केली तर उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांची जडणघडण शालेय शिक्षणातूनच झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवकल्पना करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध, त्यांचे प्रशिक्षण व त्यांना व्यवसायातून मिळणाऱ्या सन्मानाची जाणीव शिक्षकांनी करून दिली पाहिजे, अशी अपेक्षा सौ कांबळे यांनी व्यक्त केली.

एस एन डी टी विपीठाचे सिनेट सदस्य व ज्येष्ठ प्रा. सुरेंद्र निरगुडे यांची मुलाखत प्रा. शरदचंद्र बोटेकर यांनी घेतली. यावेळी शिक्षकांचे हक्क, कर्तव्य, संस्थेच्या जबाबदाऱ्या व नवीन शिक्षण धोरणात याबाबत असलेल्या स्पष्ट सूचना यांचे विवेचन झाले. यानिमित्ताने अनेक शंकांचे स्पष्टीकरण प्रा. निरगुडे यांनी केले.
विविध खेळांच्या माध्यमातून व उपलब्ध साहित्यातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, औत्सुक्य व नवनिर्माणाची उर्मी जागवता येते. यासाठी काही खेळांच्या आधारे श्री विलास कुलकर्णी यांनी शिक्षकांना प्रशिक्षित केले.

या कार्यशाळेच्या समारोपात कार्याध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी, आपल्या स्वतःच्या मुलाला ज्या प्रकारचे शिक्षण व सुविधा त्याच्या शाळेत मिळाव्यात अशी आपली अपेक्षा असते त्याच प्रकारचे शिक्षण व सुविधा आपण आपल्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना देतो आहोत का? यावर सर्वांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले.
या प्रकारच्या कार्यशाळा या नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नक्कीच मार्गदर्शक व मैलाचा दगड ठरतील अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अशा कार्यशाळा व त्यासाठी आवश्यक असणारा खर्च हा संस्थाचालकांनी करून शिक्षकांची मानसिकता निर्माण केली पाहिजे अशी यावेळी चर्चा झाली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम