महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर येथील लोवले - पडयेवाडी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मठाच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय चाललेल्या या कार्यक्रमात स्वामीभक्तांनी दर्शनासह पालखी सोहळ्यापासून महाप्रसादापर्यंत लाभ घेतला.
संगमेश्वर तालुक्यातील लोवले - पडयेवाडी येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मठाचा २४ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. सोमवार (दि. ३१) रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन होता. यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत श्री स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी मठाच्या वर्धापन दिनानिमित्त स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार (दि. ३०) रोजी दुपारी नितीन खातू यांच्या निवासस्थानापासून संगमेश्वर बाजारपेठ मार्गे स्वामींच्या मठापर्यंत श्री स्वामींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींच्या पादुकांचे पूजन करून श्री सत्य नारायणाची पूजा घालण्यात आली. पूजा झाल्यावर पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर आरती करण्यात आली. त्यानंतर लांब परगावाहून श्री स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अखेर ओझरे येथील दैत्यवाडी नमन मंडळाच्या नमनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान, श्री स्वामींच्या पालखी सोहळ्यात भाविक भक्त उत्साहाने व आनंदाने तल्लीन होऊन रमून गेले होते. हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाचे बहुमोल सहकार्य लाभले.
0 Comments