Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun कोकणातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. शेखर निकम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीची भेट

चिपळूण शहरातील विविध समस्या बाबतही दिले निवेदन


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कोकणात अवकाळी पावसामुळे झालेल्या भात व आंबा पिकांच्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार शेखर निकम यांनी  मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या होरपळणाऱ्या वेदनांचे प्रतिनिधित्व करत निकम यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत व विमा भरपाई मिळवून देण्याची ठाम मागणी केली.

यावेळी आमदार निकम यांनी कोकणातील प्रमुख समस्या मांडताना सांगितले की, भात हे कोकणातील मुख्य पीक असून अवकाळी पावसामुळे पेरणीस विलंब झाला आहे, तर आंबा उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात द्यावा.

या भेटीत त्यांनी चिपळूण शहराच्या पूर समस्या, वाशिष्ठी नदीच्या काठावरील संरक्षक भिंतींची आवश्यकता, तसेच नदी पुनर्रचनेचा 2200 कोटींचा बृहत आराखडा, आणि लाल-निळ्या रेषेच्या पुनर सर्वेक्षणाची गरज यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.

“चिपळूण शहरातील नागरिकांनी २०२१ च्या महापुरात मोठा आघात सहन केला आहे. भविष्यात अशी आपत्ती टाळण्यासाठी वाशिष्ठी नदी तीरावरील पूर प्रतिबंधक उपाययोजना ही काळाची गरज आहे,” असे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments