Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun समाज जागृतीपर लिखाणाचा गौरव

लेखक मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्कार प्रदान


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

आर्यारवी एंटरटेनमेंट'च्या वतीने येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्काराने गौरविण्यात आले रविवारी (दि. १२ जुलै २०२६) दादर मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात कदम यांना ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रा. विसुभाऊ बापट, साहित्यिक अरुण म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर तोडणकर, आर्यारवी एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा महेश्वर तेटांबे, यांच्याहस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजहित व जागृतीचे ध्यास उराशी बाळगून परखड लिखाण करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे लिखाण समाजासाठी दिशादर्शक आहे, अशी भावना यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली.

ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडतानाच तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या तसेच समाज जागृतीचे अलौकिक काम करणाऱ्या राज्यभरातील निवडक लेखक आणि पत्रकार यांना एंटरटेनमेंट'च्या वतीने कौतुकाची थाप देण्यासाठी हा पहिलाच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजसेवेची अखंड धडपड, सदैव तत्पर असणारे खेरशेत गावचे सुपुत्र मिलिंद कदम जनसेवेलाच खरा धर्म मानत समाजकल्याणासाठी निःस्वार्थ भावनेने समर्पित जीवन जगत आहेत.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव असलेले नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख आहे. आपले वडील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी, आई प्रभावती यांच्या प्रेरणेतून आणि संस्कारातून कदम यांना तरुण वयातच समाजसेवेची आवड निर्माण झाली. वडील काशीराम कदम यांच्याकडून मिलिंद यांना वेळोवेळी समाजकार्याचे बाळकडू मिळत गेले. पुढे मिलिंद चळवळ आणि आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊ लागले. अन्यायकारक विषयांवर उभ्या राहणाऱ्या लढ्यांमध्ये देखील सहभाग घेऊ लागले. शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर देखील त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आपले समाजसेवेचे कार्य असेच सुरू ठेवले. आज गुहागर पंचायत समितीत कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून उत्तम सेवा बजावित असतानाच सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक कार्यात ते अत्यंत उत्साहवर्धक सहभाग नोंदवित आहेत.

याबरोबरच विविध वृत्तपत्रांतून ज्वलंत विषयांवर ते सातत्याने परखड लिखाण करीत समाज जागृती करीत आहेत. लोकसेवेतून समाजपरिवर्तनाचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यांच्या याच अलौकिक कार्याची दखल घेत आर्यारवी इंटरटेनमेंटच्या वतीने त्यांचा अजेय लेखणी पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत पुत्र मिहीर, भाचा साहिल जाधव हे देखील उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल मिलिंद कदम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments