#Malshiras:निरा उजवा कालव्यास समांतर बंद नलिका होणेसाठी सर्व्हेक्षण करा - आ.रणजितसिंह मोहिते पाटील
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली आ.मोहिते पाटील यांच्या मागणीची दखल सर्व्हेक्षणाबाबत संबधित विभागाला दिल्या सुचना
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
निरा उजवा कालव्यावर खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर असे एकूण ५ तालुक्यांचे कार्यक्षेत्र येत असून सुमारे २.५० लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचीत होते. उन्हाळा हंगामामध्ये तापमान वाढल्यामुळे सदर पाच तालुक्यातील पिके एकाचवेळी पाण्याला येतात. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असून देखील निरा उजवा कालव्याची वहन क्षमता केवळ १५५० क्युसेक्स असल्याने व सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याने आवर्तनाचा कालावधी दोन ते अडीच महिन्यावर गेला आहे त्यामुळे सर्व तालुक्यांना एकाचवेळी पाणी देणे शक्य होत नाही.
त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होती. तसेच जलसंपदा विभागावर अतिरिक्त ताण येतो. निरा उजवा कालव्यावर वीर धरणापासून तिसंगी तलावापर्यंत बंद नलिका केल्यास एकाचवेळी सर्व तालुक्यांना पाण्याचे वितरण होऊ शकते.
तरी समांतर बंद नलिकेची व्यवहार्यता तपासणेसाठी कालव्याच्या हेड पासून टेल पर्यंत सर्वेक्षण होणे गरजेचे असून याबाबत आपले स्तरावरून संबंधितास योग्य ते आदेश व्हावेत अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली असता मंत्री पाटील यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सर्वेक्षण करून प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना केल्या आहेत.
धरण क्षेत्रामध्ये पाऊस असताना मात्र या सर्व तालुक्यांमध्ये काही वेळा पाणी टंचाईची परिस्थिती असते. तसेच धरणापासून नदीवाटे पाणी सोडले जाते त्यावेळी काही वेळेस या भागाला पाण्याची गरज असताना कालव्याची क्षमता कमी असल्याने पाणी देता येत नाही यासाठी नदीसह कालवा व बंद नलिकेद्वारे पाणी देता येईल.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मागणीमुळे निरा उजवा कालव्यावरील खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर असे एकूण ५ तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Comments
Post a Comment