#Pune:मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ व महिला मंडळाचा वर्धापनदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ आणि मौजे तिवरे गंगेचीवाडी भगिनी महिला मंडळ, पुणे यांच्यामार्फत मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त कौटुंबिक मेळावा, हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. रविवार (दि.२७) रोजी उद्यान प्रसाद कार्यालय, एस.पी. कॉलेज जवळ, पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम हे उपस्थित होते.

पुण्यातील मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळाचा ५०वा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. गंगेचीवाडीतील पूर्वज कामधंद्यानिमित्त गाव सोडून पुणे येथे येऊन स्थायिक झाले. पुण्यामध्ये राहणारी मंडळी सुखदुःखाच्या वेळी एकत्र येऊन गावच्या सार्वजनिक विकासासाठी एकत्र कशी येतील याचा विचार करून १९७२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक कामे राबविण्यात आली.

तसेच वाडीतील पुणे शहरात राहणाऱ्या महिला व भगिनींना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी 'चूल आणि मूल' यातून बाहेर पडून सामाजिक प्रवाहात भाग घ्यावा यासाठी अनंत रांगणे यांच्या प्रयत्नातून १९९५ साली मौजे तिवरे भगिनी महिला मंडळाची स्थापना झाली. त्यातून एकत्र येत महिलांनी अनेक आर्थिक स्त्रोत निर्माण केले. त्यालादेखील २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. अशा या मंडळांची उत्तरोत्तर प्रगती होत वाडीतील, गावातील आणि पुणे शहरात राहणाऱ्या सर्वांसाठी मानाचे स्‍थान तयार झाले आहे.
    
दरम्यान, कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता सत्यनारायणाची पूजा घालून नंतर दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. ह्यात महिला व पुरुषांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व लहान मुलांसाठी नृत्य, खेळ व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुपारचे व रात्रीचे स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
     
यावेळी मौजे गंगेचीवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कदम, उपाध्यक्ष सतीश जाधव, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा संगीता येलकर, उपाध्यक्षा रोहिणी रांगणे, तिवरे ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाचांगणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण गो. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत रांगणे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत