#Chiplun:''आरोग्य रक्षणाय व्याधी निग्रहणाय'' ही भूमिका अपरांत हॉस्पिटल नक्कीच पार पाडेल - आ. शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
अपरांत हॉस्पिटल येथे महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार श्री शेखरजी निकम व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रत्नदीप साळोखे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
या योजनेअंतर्गत पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना अपरांत हॉस्पिटल येथे कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.पोलिसांसाठी अश्या प्रकारची योजना उपलब्ध करून देणारे अपरांत हॉस्पिटल हे उत्तर रत्नागिरी येथील पहिले हॉस्पिटल आहे.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना अनेकदा त्यांना शारीरिक व मानसिक ताण तणावातूनच जावे लागते. त्यांच्यासाठी "आरोग्य रक्षणाय, व्याधी निग्रहणाय" अशी भूमिका अपरांत हॉस्पिटल निश्चितपणे पार पाडेल अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रत्नदीप साळोखे यांनी अपरांत हॉस्पिटलच्या या योजनेचा लाभ बाणकोट ते संगमेश्वर मधील सर्व पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चिपळूणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल अपरांत हॉस्पिटलचे आभार मानले.
या कार्यक्रमाला अपरांत हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय रीळकर ,डॉ. यशवंत देशमुख, डॉ. अब्बास जबले, डॉ. शेखर पालकर, यांचे समवेत चिपळूण तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सेक्रेटरी डॉ नीयाज पाते, ज्येष्ठ प्रॅक्टिशनर डॉ. संतोष दाभोळकर, अपरांत हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन हॉस्पिटलचे एडमिन श्री. अमर भोसले यांनी केले.कार्यक्रमाची सांगता करताना अपरांत हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ.यतिन जाधव यांनी, तीन वर्षापूर्वी अपरांत हॉस्पिटल रुपी लावलेले रोपटे समाजातील विविध घटकांसाठी त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेची भर पडली असून अपरांत हॉस्पिटल आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवा व सुविधा देणारा वटवृक्ष होण्यासाठी मार्गक्रमण करत आहे. हॉस्पिटलच्या या प्रवासात कळत नकळत सहयोग लाभलेल्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment