#Natepute:अभिमान आहे मला मी शिक्षक असल्याचा - गणेश राऊत सर
महादरबार न्यूज नेटवर्क -
खरंच अभिमान आहे मला मी शिक्षक असल्याचा सर्वांच्या नशिबात जे नसतं असं अगळं वेगळं आयुष्य शिक्षकांचे असते. समाजामध्ये शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षक आपले संपूर्ण आयुष्य मुलं आणि शाळेसाठी खर्च करतात. मुलांना चिखलाचा गोळा असं म्हटलं जातं आणि त्या चिखलाच्या गोळ्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम गुरु म्हणजेच शिक्षक करत असतात. समाजात नेहमी असं म्हटलं जातं की ‘ बालपण देगा देवा ' . लहानपण सर्वांना आवडतं पण एकदा गेलेले लहानपण पुन्हा परत येत नाही असे म्हणतात. पण याला अपवाद म्हणजे शिक्षकांचे जीवन. शिक्षकांच्या जीवनात बालपण पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांच्या रूपात येतं. मुले म्हणजे देवाघरची फुले, निरागस, कोमल बालके शाळेत येतात आणि आम्ही शिक्षक या फुलांची सेवा करणारे सेवक.
आम्ही या निरागस मुलाप्रमाणे लहान होऊन हसतो, खेळतो , बागडतो , नाचतो गातो आणि या सर्वांत आम्ही लहान होऊन त्यांचे मित्र बनून त्यांच्या आयुष्याला एक वेगळा आकार देण्याचा प्रयत्न करतो. सांगाबर खरंच आमचे बालपण परत आले की नाही. लहानपणी आपण सांगायचो आम्ही दररोज शाळेत जातो. पण आम्ही आजही सांगतो शाळेत जातो, शाळेत आहे, शाळेचे काम चालू आहे हे सर्व सांगताना खरंच खूप छान वाटतं. आणि खरोखरच दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे शिक्षक कधी कामाला जात नाही खरंच कधीच नाही. तो शाळेत जातो आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य बागेप्रमाणे सुंदर बनवण्याचे काम करतो. दररोज मुलांसोबत हसत खेळत तर कधी विशेष दिवशी मुलांप्रमाणे नटून उत्साहाने आणि आनंदाने शाळेत जातो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात त्या निरागस बालकांना ते बागेतील फुलाप्रमाणे सदैव खुलवत ठेवतात आणि स्वतःही कायम उत्साहित व टवटवीत होऊन दुसऱ्यांना उत्साहित करतात.
पुराण काळापासून अनेक शिक्षक होऊन गेले, काही शिक्षक तर असे होऊन गेले ज्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले. यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी कर्वे आदींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पूर्वी म्हणायचे “छडी लागे छम छम विद्या येई घमघम” पण सरकारी नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षा करणे अनुचित आहे परंतु आम्हाला कधी कधी कठोर होऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तसेच त्यांना पुढच्या जीवनात कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी थोडीफार शिक्षा करावी लागते.
विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्यासोबत हसणे, खेळणे, लहान होऊन त्यांच्यात रममान होणे हे भाग्य फक्त शिक्षकांच्याच नशिबात आहे. अनेक मुलांना लळा लावून त्यांच्यात आपुलकी निर्माण करून त्यांना निरोप देते वेळेस त्यांच्यासाठी व्याकुळ होणारा फक्त शिक्षक असतो. गुरु शिष्य यांचे आगळे वेगळे नाते आहे त्यांच्यातली ओढ वेगळी आहे त्यांच्यातला ऋणानुबंध वेगळा आहे तो काय आहे कोणाला कळणार नाही. पण अशा या निरागस कोमल बालकांसाठी हळव्या मनाने आपुलकीने राष्ट्र उभारणीचे, ज्ञानदानाचे पुण्याचे काम फक्त शिक्षकांच्या नशिबात आहे म्हणूनच मला अभिमान आहे मी शिक्षक असल्याचा.
श्री.गणेश राऊत सर
९५०३४८६७८८
Comments
Post a Comment