#Chiplun:चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील विकास कामांकरिता निधी देण्याची आवश्यकताआ. शेखर निकम यांची पालकमंत्री उदय सामंतांकडे मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक कामांना निधीची गरज असून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणी बरोबर शहरातील अन्य कामासाठीही निधीची मागणी करून जल संधारणाच्या मंजूर कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे आ. शेखर निकम यांनी केली. महत्त्वपुर्ण प्रकल्प आणि चिपळूण संगमेश्वरच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचे आश्वासन यावेळी ना. सामंत यांनी दिल्याने चिपळूणच्या सौंदर्यात भर पडताना रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बहुतांशी कामांना स्थगिती देण्यात आली आहे तर अन्य कामांना निधीची गरज असल्याने सध्या निधी उपलब्ध होणे अवघड झाले होते. आ. शेखर निकम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याच्या विकासाची पुरेपूर जाण असणाऱ्या उदय सामंत यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली आणि चिपळूणच्या विकासाचे निवेदन ही त्यांना दिले.
गत कित्येक वर्षे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय गाजत आहे. दुरुस्ती नंतर ही हे केंद्र बंद आहे. या केंद्रातील उर्वरित कामांची पूर्तता झाली तरच हे केंद्र सुरू होऊ शकते. यासाठी सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अनेक वेळा आपण स्वतः मंत्री म्हणून पाहणी आणि निधी ही उपलब्ध करून दिला असून आता सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सदरचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली.
तर शहरात छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी सभोवती काँक्रिट भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीवर दगडी आच्छादन करण्यासाठी एक कोटी पस्तीस लाखाची आवशक्यता आहे. तर कै. खेडेकर क्रीडा संकुल इमारतीमध्ये बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यासाठी वीस लाखाची गरज आहे. शहरातील ह्या तीन महत्वाच्या कामांना आपण निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी ना. सामंत यांच्याकडे केली.
तीवरे धरण फुटल्यामुळे या विभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. धरणाच्या डिझाइनचे काम नाशिक येथे सुरू आहे. आपण याची माहिती घेऊन हे डिझाईन लवकर उपलब्ध व्हावे आणि जेणेकरून धरणाचे काम लवकर सुरू कसे होईल यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती आ. निकम यांनी केली. त्याच बरोबर सावर्डे खोतवाडी ल.पा. योजनेला मंजुरी मिळाली आहे. सर्व्हेक्षण आणि पाणी उपलब्धता प्रमाणपत्र ही मिळाले आहे. प्रशासकीय मंजुरी मिळावी आणि रिकटोळी, तीवडी, शिरगाव, वेताळवाडी व संगमेश्वर येथील कलंबूशी या योजनांवर स्थगिती असून ही स्थगिती उठवून त्या त्या ठिकाणचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी आ. निकम यांनी केली.
राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आ. निकम यांच्या निवेदनावर चर्चा करून या विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देताना चिपळूण संगमेश्वरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Comments
Post a Comment