#Pune: जाणीव ममतेची
इयत्ता पाचवीचा वर्ग सुटला, सोनू ची पावलं घराकडे वळाली. गावापासून 3 किमी शाळा दूर होती. कोवळच वय चालून चालून दमायला व्हायचं.दारात चपला काढता काढताच सोनू म्हणाला ए आई मला भूक लागली काही तरी खायला दे ना ग! आई उत्तरली अगोदर घरात तर ये!हात पाय धुवून घे. नको ग आई आधी खायला दे,मला खूप भूक लागली. आईने भाकरीच टोपलं तपसलं, बाळा भाकरी आणि भाजी आहे खाऊन घे, सोनू म्हणाला नको ग आई काहीतरी चांगल बनव. घरात अठराविश्व् दारिद्र्यचं....पण अशातही जर कोणी अचानक आलंच तर 2 भाकरी जास्तीच्या असायच्या कायम तेव्हाची लोकं पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असायची... घेणार का, खाणार का असा सूर नसायचा. सरळ ताट समोर यायचं.आई , आलेच म्हणत शेजारी गेली आणि काहीतरी साडीच्या पदराआड उसणवार घेऊन आली. आणि बनवून दिलं. त्याला काय खाण्यात राम मग कुठून का येईना... शेवट खोडकर वय ते पण तो खाताना तिच्या चेहऱ्यावर प्रचंड सात्विक आनंद आणि समाधान होत.
पोटात ढकलून सोनू गेला मित्रांमध्ये खेळायला. तशी आई स्वाभिमानी कधी, कोणत्याही संकटात कुणापुढे हात न पसरणारी, न झुकणारी, आणि आपल्या परिस्थितीच रडगाणं गाऊन समोरून दया मिळावी याची तिला प्रचंड चीड. पण भुकेल्या लेकरासाठी सगळी तत्व बाजूला!शेवट आईचं ती!नवरात्रीचेचं दिवस होते ते सर्वत्र व्रत, वैकल्य, उपवास चालू होते.निसर्गानेही हिरवीगार चादर अंगावर घेतलेली, गुलाबी थंडीची नुकतीच सुरुवात झालेली अंधारच पडत होता.
सोनू घरी आला चपला काढत असताना आई वडिलांचे बोलणं त्याच्या कानावर पडलं, तो क्षणभर थांबला. वडील आईला म्हणतं होते अगं परवा दिवशी सकाळी तू फराळ केलास तेव्हा पासून अन्नाचा कण तुझ्या पोटात नाही, आपली परिस्थिती ही अशी तुला परत खायला मिळेल न मिळेल. त्या पेक्षा सोड तो उपवास आणि भाकरी खा. यावर आई म्हणाली हा उपवास आपली लेकरं सुखी राहावी म्हणून आईच्या चरणी केलेलं गाऱ्हाणं आहे. मी उपवास नाही सोडणार पाणी पिऊन दिवस ढकलेन कसेतरी. बाहेर ऐकत असणाऱ्या सोनू च्या डोळ्यात टचकण पाणी आले.
आपण 2 तासापूर्वी खाल्लं तरी परत कडकडून भूक लागतीये आणि आई दोन दिवस झालं उपाशी आहे पण साधं जाणवून दिलं नाही तिनं रात्री आई सोडून सगळे जेवायला बसले रोज आई तू ही घे ना आमच्या बरोबर म्हणणारा सोनू आईला काहीच बोलला नाही. कारण ती म्हणायची फराळ एकांतात करावा लागतो तू घे जेवून मी करेल नंतर त्या एकांताचा अर्थ त्याला समजला होता. त्याच्या घशाच्या खाली आज घास उतरत नव्हता. थोडंसं खाऊन भूक नाही म्हणतं सोनू ताटावरून उठला. रात्रभर त्याला झोप नव्हती त्याच्या डोक्यात तो विषय येत होता. दुसऱ्या दिवशी आईने डबा दिला खरा पण तो भूक नाही म्हणतं त्याने मित्रांमध्ये वाटला.
शाळेतून घरी चालत येत असताना त्याचं विचारचक्र चालूचं होते. आई साठी काहीच न करता येत असल्याच त्याच्या मनाला वेदना देत होत. त्याचा मित्र सागर आज तोंड का पाडलंस असं बोलला, पण काही नाही म्हणतं त्याने विषय बदलला. गावात येत असताना राजाराम पाटलांचं घर लागतं. त्यांनी थोडं काम आहे म्हणतं ए पोरांनो इकडं या म्हणून हाक मारली.दोघे गेल्यावर पाटलांनी थोडं लिखाण काम आहे, यालं का रात्री जेवल्यावर 10/11 वाजता, थोडे पैसे ही देईल.यावर सागर काही बोलायच्या आत सोनू बोलला हो येऊ कि आम्ही रात्री. आणि असं बोलून दोघे ही निघून गेलीत, थोडं लांब आल्यावर पाटलांनी परत आवाज दिला नक्की या रे फसवू नका, त्यावर सोनू एकटाच बोलला हो नक्की येऊ . थोडं लांब आल्यावर सागर बोलला काय गरज होती तुला हो म्हणायची मी तर नाही येणार बाबा. तू जा तुला जायचंय तर.घरी पोहोचल्यावर सोनू बोलला ए आई आज लवकर जेवण कर आम्हांला पाटलांनी बोलवलं आहे थोडंसं लिहून द्यायचंय त्यांना, आई ने ही लवकर जेवण केलं व जेवून सोनू सागर ला घरी बोलवायला गेला. सोनू ला दारात पाहुण अजून न जेवलेला सागर खेकसला आलास का तू ए जा बाबा मी नाही येणार मला जेवून झोपायचंय! मैत्रीची शपथ देत सोनू ने सागर ला कसाबसा तयार केला व सागर चं पटकन जेवण आवरून दोघेही पाटलांच्या घरी पोहचले. दोघांना पाहताच पाटील बोलले अरे वा खूप लवकर आलात. बरं झालं तुम्ही लिखाणाला सुरुवात करा मी जेवून घेतो जरा.असं म्हणतं 3/4 मोठी रजिस्टर त्यांच्या समोर ठेवली दोघांनी ही लिहायला सुरुवात केली, लिखाण करता करता 12 वाजले होते दोघांच्याही डोळयांवर झोप आली होती.सागर मध्ये मध्ये सोनूकडं रागातच पाहत होता.तेवढ्यात हे शेवटचं म्हणतं पाटलांनी अजून दोन रजिस्टर त्यांच्या हातात दिली , आता मात्र सागर चा पारा चढला होता पण त्याच्याकडे न पाहता सोनू ने लिखाणाला सुरुवात केली.
कसेबसे 1वाजता लिखाण आटोपले. पाटलांनी स्मित हास्य देत आभार मानून 30/30 रुपये दोघांच्या हातावर टेकवले. दोघे घराकडे निघाले. एवढेच दिले म्हणतं सागर तनतनत होता. सोनू घरी पोहो चला तर वाट पाहत आई जागीच होती. किती वेळ लावला म्हणतं बरीच बोलणी खात सोनू झोपी गेला. सकाळी लवकर आटोपून शाळेत गेला. शाळा कधी सुटते या वरचं सोनू चे सर्व लक्ष होते. ती सुटल्यावर काम आहे म्हनतं सागर ला घेऊन बाजारच्या गावाला शाळेच्या पुढे 1 किमी दोघेही निघाली. दप्तरात रात्री मिळालेले 30 रुपये तसेच ठेवले होते.
बाजारात पोचल्यावर त्या तीस रुपयाचा फराळ खरेदी केला आणि दप्तरात ठेवला .सागर बोलला अरे मी तर रात्री चे पैसे जपून ठेवलेत मला नवीन चप्पल घ्यायची तू सगळे संपवलेस का?सोनू काहीच बोलला नाही.सोनू ला झालं होत कधी घरी पोहोंचतोय आणि आईला ते फराळाचं खायला देतोय. शेवटी घर जवळ आलं सोनूने दारातूनच आईला मोठ्याने आवाज दिला. आई म्हणाली ये आलास का बाळा, आज एवढा उशीर का केला मी केव्हा पासून वाट पाहतीये.हात पाय धुवून घे, तुला भूक लागली का? सोनू काहीच बोलला नाही.
आईच्या शेजारी जाऊन बसला आईने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला. चालून दमलास का रे असं म्हणतं सोनू चे पाय दाबू लागली, तेवढ्यात सोनूने आईला थांबवत शेजारी ठेवलेल्या दप्तरात हात घातला. आणि फराळाचं काढून आईच्या हातात दिलं. सोनू ला वाटलं आईला आनंद होईल. पण आईचा पहिला प्रश्न कुणी दिलं? कुठून आणलंस. सोनू बोलला रात्री लिखाण केल्यावर 30 रुपये मिळाले होते ना त्याचं आणलं हे साहित्य. आई म्हणाली रात्री जागून तू त्या पैशाचं मला फराळाचं आणलंस असं म्हणतं सोनू ला जवळ घेत कडकडून मिठी मारली. सोनू ही आईच्या कुशीत विसावला. काही क्षणात पाठीवर काहीतरी ओलं झाल्याच सोनू ला जाणवलं सोनूने पाहिलं तर आई च्या डोळयांतून पडणारे अश्रू त्याची पाठ भिजवत होते.
एवढ्या कमी वयात तुला ही जाणीव कुठून आली रे म्हणतं ती हुंदके देत होती. खऱ्या अर्थाने त्या वेळी सोनू च्या आईला देवी पावली होती. उपाशीपोटी राहून धरलेली नवरात्रात खऱ्या अर्थाने संपन्न झाली होती. आणि सोनूला तर देवी चं माहित नाही पण त्याची खरी देवी त्याचावर आज प्रसन्न झाली होती. व या गरीब कुटुंबात त्या रात्री खरी नवरात्री संपन्न झाली होती.
लेखक - देवेंद्र शिळीमकर
Comments
Post a Comment