#Solapur:नदी संवाद यात्रा लोकसहभागाची चळवळ व्हावी - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

‘चला जाणूया नदीला’ अभियान जिल्हास्तरीय समिती आढावा बैठकीत दिल्या सूचना


सोलापूर, दि. 13, (जि. मा. का.) - ‘चला जाणूया नदीला’ अभियानामध्ये जिल्ह्यातील कासाळगंगा, भीमा, कोरडा, आदिला, दुबदुबी आणि माणगंगा नद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रे’चे आठवडाभरात नियोजन करावे. या यात्रेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद केली जाईल. ही नदी यात्रा आशयपूर्ण, प्रभावी आणि लोकसहभागाची चळवळ होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आराखडा करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

     नियोजन भवन येथे आयोजित ‘चला जाणूया नदीला’ अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहायक जिल्हाधिकारी मनिषा ओव्हाळे, उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव धैर्यशील पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चारूशीला देशमुख - मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह समितीचे सदस्य व नदीप्रहरी सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, गेल्या काही वर्षात पूर किंवा दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार जाणवत आहेत. या पार्श्वभूमिवर नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्याची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांच्या उपस्थितीत मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेला आढावा व त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांची माहिती समिती सदस्यांना प्रारंभी दिली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, हे अभियान राबविताना प्रथम नदी प्रदूषणाची कारणे, त्याचा अभ्यास, समस्या, उपचार व निदान अशा टप्पे आहेत. तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी व नदीप्रहरी सदस्य यांची बैठक घ्यावी. या अभियानात लोकसहभाग असणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक असून, त्यासाठी शिक्षण विभागाने विद्यापीठाच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे आयोजन करावे. नोडल अधिकारी व समन्वयक यांनी सर्व संबंधित विभागांशी नियमित संपर्क ठेवावा.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, या अभियानातून नदीचे महत्त्व विषद करून, नागरिकांमध्ये नदीबद्दल आत्मियता निर्माण करणे गरजेचे आहे. नदीजलातील अपप्रवृत्ती व कुप्रथा टाळून नदीसंवर्धनाला हातभार लावण्यासाठी नियोजन करणे अपेक्षित आहे.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीच्या सदस्यांची मते जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी नदीप्रहरी सदस्यांनी प्रत्यक्षात अपेक्षित असलेली कामे, त्यात येणारे अडथळे व अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी याबद्दल मते मांडली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत