#Yavat:मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा होणार
3 डिसेंबर रोजी राज्यातील 10,000 पत्रकारांची एकाच वेळी आरोग्य तपासणी होणार
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. एस.एम.देशमुख यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.3 डिसेंबर रोजी किमान दहा हजार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात येईल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
समाजासाठी कार्यरत असताना पत्रकारांचे कायम आरोग्याकडे दुर्लक्ष होते.. त्याचा फटका असंख्य पत्रकारांना बसलेला आहे.. मात्र यापुढे ही वेळ कोणत्याही पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषद आपला वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करते.. या दिवशी राज्यातील प्रत्येक तालुक्यात स्थानिक डॉक्टर्स, रोटरी किंवा लायन्स क्लब किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.. गेल्या वर्षी 8 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, यावर्षी 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा मराठी पत्रकार परिषदेचा संकल्प आहे.. .. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार आरोग्य तपासणी करण्याचा हा जागतिक विक्रम ठरणार आहे.. यावर्षी पासून आरोग्य तपासणी शिबिराला जोडून रक्तदान शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत आहे.. तरूण पत्रकार या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करतील..
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पत्रकारांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.. .. तपासणीत कोणाला काही व्याधी असल्याचे दिसून आले तर त्याची पुढील उपचाराची व्यवस्था देखील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे. राज्यातील परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघामार्फत या शिबिराचे आयोजन केले जात असून जास्तीत पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य महिला प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दी प्रमूख संदीप कुलकर्णी, राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, परिषदेचे आरोग्य दूत दीपक कैतके तसेच परिषदेचे उपाध्यक्ष, संघटक, विभागीय सचिव आदिंनी केले आहे.
Comments
Post a Comment