#Chiplun श्री क्षेत्र टेरव येथे २५ मार्चपासून साजरा होणार शिमगोत्सव
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात २५ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ, पुजारी हे उत्सवाची जय्यत तयारी करीत आहेत.
Advertisement
२५ मार्च रोजी सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजारी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतील. गावचे पुजारी (गुरव) मंदिरातून या वर्षी चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या नवीन घडविलेल्या रुपी लावून मंदिर व होमा समोरील मानाच्या सहाणेवर आसनस्थ होईल. सकाळी ९ वाजता ढोलताशांचा गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. प्रदक्षिणा घालताना भैरी- केदाराच्या चांगभलं असे म्हणत पालखी नाचवत उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाते, तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. सुवासिनी सहाणेवर पालखीत देवीच्या ओट्या भरतील व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न होईल.
संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा 'छबिना' काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणली जाईल. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थ आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करतात व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत करतात. वाडी- वाडीतील सुवासिनी छबिन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आस्थेने ओट्या भरतात.
घरोघरी पालखी नेण्यात येते यास ' 'भोवनी'असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित असतात. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होते. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी उपस्थित राहतात.
सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविला जातो. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजवितात, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता रुपी भंडारुन करण्यात येते. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात.
Comments
Post a Comment