महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप खडकवासला धरणाचे मुळा-मुठा उजव्या कालव्याला रब्बी हंगामाचे पहिले अवर्तन सुरू झाले असल्याची माहिती यवत पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे दौंड तालुक्यासह इंदापूर, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चालू पावसाळ्यात धरण भागात चांगला पाऊस झाल्याने खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणाच्या पाण्यावर दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यातील बरेच शेती अवलंबून आहे. मुळा- मुठा कालव्याचे अवर्तन गेली दोन महिन्यांपासून बंद होते त्यातच दौंड तालुक्यात या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती पिके धोक्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांना वरदान ठरणारा जुन्या बेबी कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याने बेबी कालव्याचे पाणी बंद करण्यात आले असल्याने शेती पिकांना पाण्याची चणचण भासू लागली होती. सध्या रब्बी हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी गहू , हरबरा, कांदा, मका यासह आदी पिके घेतली आहेत. मुळा- मुठा कालव्याला रब्बी हंगामातील पहिले अवर्तन सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याचे अवलंबून असलेल्या तलाव यासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे अवर्तन पुढील ४५ दिवस सुरू राहण्याचा अंदाज आहे.
0 Comments