महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात काही दिवसांपूर्वी कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घाटात गेल्या काही वर्षात वारंवार अपघात घडले असून हा घाट धोकादायक बनलेला असल्याने या घाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. याचबरोबर मुंबई गोवा महामार्ग, कळंबस्ते रेल्वे फाटक येथे ओव्हरब्रीज, मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे २०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, यासारख्या मागण्या मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.
आ. शेखर निकम यांनी आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये अधिवेशनात कोकणातील प्रलंबित प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधण्याबरोबरच या प्रश्नांची पूर्तता करण्यात काही अंशी यश मिळवले आहे. आता दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात देखील काही प्रश्न मांडले. तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील तितक्याच पोटतिडकीने रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी आ. निकम म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर- विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाट महत्त्वाचा आहे. मात्र. हा घाट अतिशय धोकादायक बनलेला आहे. काही दिवसांपूर्वी कुंभार्ली येथील विश्वजीत व श्रीकांत खेडेकर माय-लेक पुणे येथून कुंभार्लीकडे येत असताना त्यांची गाडी अवघड वळणावर दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोन दिवस थांगपत्ता लागला नाही. अखेर येथील ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने या दोघांचा शोध लागला. एकंदरीत ही घटना पाहता या घाटाची अवस्था लक्षात येईल. तरी या घाटात उत्तम दर्जाचे संरक्षण कठडे उभारणे गरजेचे आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे, असे आ. निकम यांनी यावेळी नमूद केले.
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सातत्याने आवाज उठवण्यात आला आहे. पुढील काळात तरी या मार्गाच्या पूर्णत्वाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे अशी मागणी केली. याचबरोबर कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण रेल्वे स्टेशनच्या नजीक कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. येथे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी केल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या मागणीला अजून तरी यश आलेले नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसात फाटक न पडण्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. तरी कळंबस्ते फाटक येथे ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.
चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते डांबरीकरणाची कामे एकाच ठेकेदाराला मिळाले आहेत. ही कामे पोटठेकेदार करीत असल्याची माहिती मिळत आहे. या रस्त्यांची कामे अल्पावधीतच नादुरुस्त होत आहेत. तरी ठेकेदारांना ताकीद देण्यात यावी, अशी मागणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. मात्र, वृक्ष लागवड होताना दिसत नाही. भविष्यात वृक्ष लागवड करताना देशी वृक्ष लागवड करण्यात यावी व याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे यावेळी आ. निकम यांनी स्पष्ट केले.
जि. प. ग्रामीण रस्त्यांची देखील दुरावस्था असून साकव, पूल यांसाठी विशेष कार्यक्रम मंजूर व्हावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, हा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तरी या प्रश्नाकडे देखील लक्ष देण्यात यावे, अशी मागणी केली.
याचबरोबर मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण शहरा नजीकच्या कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून येथे २०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे. जेणेकरून येथील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. संगमेश्वर येथील ट्रमाकेअर सेंटर मध्ये पदे रिक्त आहेत. ती भरण्यात यावीत. देवरूख ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभारली गेली असून येथे मूलभूत सुविधांची गरज आहे, असे अनेक मुद्दे मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.
0 Comments