महादरबार न्यूज नेटवर्क -
वाघेश्वर विद्याधाम शिरूरच्या निवृत्त शिक्षीका स्नेहप्रभा अरणकल्ले यांनी निवृत्तीनंतर अनोखा छंद जोपासला आहे. गोरगरीबांच्या बाळांसाठी त्या स्वखर्चाने कापड आणून टोपडे-झबले-दुपटे शिवून देतात. आतापर्यंत त्यांनी ४०० हून अधिक गोरगरीब कुटुंबातील बाळांसाठी टोपडे-झबले शिवून दिले आहेत.
स्नेहप्रभा या शिरूर येथील वाघेश्वर विद्याधाममध्ये शिक्षीका होत्या. त्यांना आदर्श शिक्षीका पुरस्कारही मिळालेला आहे. त्या काही वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या असून त्यांनी निवृत्तीनंतर गरीब कुटुंबातील बाळांसाठी मोफत टोपडे-झबले शिवून देण्याचा छंद जोपासला आहे. यातून पैसा मिळवणे हा हेतू नसून स्वत:चा आनंद व छंद म्हणून ते हे काम करतात. त्या आता ८० वर्षांच्या आहेत. २०१९ मध्ये त्यांची ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. तर २०२१ मध्ये त्या झोपेतच पलंगावरून पडल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना चालता येत नाही. वाॅकरचा आधार घ्यावा लागतो. मात्र एवढे दु:ख असून ही त्या आपल्या हाताने बाळांसाठी झबले-टोपडे-कुंच्या शिवून गरीब कुटुंबातील बाळांसाठी देतात.
"मी दहा दिवसांपासून एक वर्षाच्या बाळांसाठी झबले, बेबी फ्राॅक, बिन बाह्यांचे जॅकेट, कुंची, टोपडे, पेटीकोट असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवते. मी शिवून दिलेले कपडे बाळांना घातल्यानंतर ते मला व्हाट्सअपवर फोटो पाठवतात. या कामातून मला खुप आनंद मिळतो."
- स्नेहप्रभा नं. अरणकल्ले
0 Comments