Hot Posts

6/recent/ticker-posts

#Karmala खरीप पीक लागवडीमध्ये बीजप्रक्रिया महत्त्वाची - डॉ. पंकज मडावी


महादरबार न्यूज नेटवर्क -
आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियजण प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दि. २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत केले जाणार आहे. आज दि. ०८ जून २०२५ करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे कार्यक्रमास आयोजन करण्यात आले.

खरीप हंगामातील पीक लागवडीमध्ये बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये बिजप्रक्रिया केल्यास उत्पन्न वाढीसाठी मदत होईल असे प्रतिपादन डॉ. पंकज मडावी यांनी केले. बदलत्या जीवनशैलीसाठी मानवी आहारात भरड धान्यचे अनन्यसाधारण महत्व असे डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी प्रतिपादन केले तसेच उपस्थित शेतकऱ्यांना राळ्याचे विकसित वाण CFXMV2 या भरडधान्याचे मोफत बियाणे वितरित केले.
डॉ. शिल्पा परशुराम, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंब पिकावरील कीड व रोग याबद्दल मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र मोहोळचे श्री. दिनेश क्षिरसागर विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी, कडधान्य प्रक्रिया, प्रक्रिया उत्पादनाचे पॅकिंग, लेबेलिंग, ब्रंडिंग आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी उप कृषि अधिकारी श्री  राजेंद्र खाडे, सहायक कृषि अधिकारी श्री. गणेश पारेकर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुयोग ठाकरे, कार्यक्रम सहाय्यक (संगणक) यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments