महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत चिपळूण बहादूरशेखनाका ते प्रांत कार्यालयापर्यंत होत असलेला उड्डाणपूल कापसाळपर्यंत व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करताना मुंबईत झालेल्या बैठकीत देखील यासंदर्भात चर्चा करताना चिपळूण शहरातील उर्वरित उड्डाणपुलासाठी निधीसह मंजुरी मिळण्याची आग्रही मागणी केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी महायुतीची बैठक झाली. या बैठकीत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत होत असलेल्या उड्डाणपुलामुळे भेडसावत असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. तर हा पूल कापसाळपर्यंत व्हावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली व तसा निर्धार करण्यात आला. यानुसार आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने सावर्डे येथे महायुतीच्या शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. या बैठकीत महायुतीतर्फे प्रांत कार्यालय ते कापसाळ दरम्यान उड्डाणपूल व्हावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीत आमदार शेखर निकम यांनी 'मी पूर्वीपासूनच उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करीत आहे'. आता जनतेचा पाठिंबात ठाम आहे. त्यामुळे या मागणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.
यानुसार आमदार शेखर निकम यांच्या विशेष पुढाकाराने महायुतीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांची मुंबई भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार निकम यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत होत असलेल्या चिपळूण शहरातील उड्डाणपुलाची माहिती दिली. तसेच प्रांत कार्यालयापर्यंत होत असलेल्या उड्डाणपुलामुळे भेडसावत असलेल्या प्रश्नांची माहिती दिल्यावर आमदार शेखर निकम यांच्यासह महायुतीच्या शिष्टमंडळाने ना. शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन दिले.
यानुसार मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग असून सद्यस्थितीत त्याचे काम प्रगतिपथावर आहे. तथापि, चिपळूण शहराच्या सीमांतर्गत या महामार्गाचा काही भाग उड्डाणपुलाच्या स्वरूपात पूर्ण झाला असून उर्वरित भाग मात्र जमिनीवरून जात आहे. परिणामी, संपूर्ण शहरात अनेक गंभीर शहरी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
हा अर्धवट उड्डाणपूल चिपळूण शहरातील घनदाट लोकवस्ती, सामाजिक आणि शासकीय रचना, न्यायालय, शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये तसेच अल्पसंख्याक व मागासवर्गीय नागरिकांची रहिवासी वसाहत यांना थेट बाधित करत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात घडले आहेत काहींमध्ये नागरिकांनी जीव गमावले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
तसेच, उड्डाणपूल संपल्यावर अचानकपणे वाहतूक जमिनीवर आल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहात नाही आणि शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोणतीही सुसज्ज अॅप्रोच रोड किंवा सर्कल उपलब्ध नसल्याने मोठा अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण शहराच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उभा ठाकलेला आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रीय महामार्ग विभागाने उर्वरित उड्डाणपुलासाठी अंदाजपत्रक तयार केले असून त्याचा खर्च सुमारे ११० कोटी रुपये आहे. या प्रस्तावास तातडीने मान्यता मिळणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून उर्वरित शहराचा भाग विशेषतः कापसाळपर्यंतचा मार्ग उड्डाणपुलाखाली आणता येईल व शहराच्या अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होईल.
सदर मागणी ही चिपळूण शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व जनतेची एकमुखी मागणी आहे. आपण या जनहिताच्या मागणीची गंभीर दखल घेऊन उर्वरित उड्डाणपुलास मंजुरी देवून, त्यासाठीचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून शहरवासीयांना दिलासा मिळू शकेल. तरी याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक किशोर रेडीज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष व महायुती समन्वयक उदय ओतारी, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक दीपा देवळेकर, युवा सेना चिपळूण तालुकाधिकारी निहार कोवळे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, युवासेना शहराधिकारी विनोद पिल्ले, निनाद आवटे, अमित चिपळूणकर, विनायक वरवडेकर, कुणाल आंबेकर तसेच अधिकारी देखील उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करावा
गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असून जिथे- जिथे खड्डे पडले आहेत. तेथील खड्डे बुजवून महामार्ग खड्डे मुक्त करण्यात यावा याचबरोबर फूट ब्रिज जिथे प्रस्तावित आहेत. या संदर्भात देखील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता श्री. शेलार येत्या दोन दिवसात मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार असून नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले देखील पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 Comments