महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत सावर्डे फार्मसी कॉलेज येथे पार पडला. या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
या बैठकीत धामापूर गटातून सुशील भायजे आणि हातीव गटातून मंगेश बांडांगळे, निवे गटातून प्रफुल्ल बाईत यांच्या नावांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर होते. त्यांनी पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच आरक्षण पद्धतीची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक गटानुसार कार्यकर्त्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
कार्यकर्त्यांनी “आमदार शेखर निकम जे धोरण ठरवतील तेच मान्य” असा एकमुखी निर्णय घेतला. सर्वांनी एकदिलाने निवडणूक जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला.
मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम म्हणाले की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुतीच्या रूपात लढवायच्या आहेत. उमेदवार कोणताही असो, त्याला विजयी करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. उमेदवारी देताना सामाजिक समतोल राखत ‘सोशल इंजिनिअरिंग फार्म्युला’ वापरण्यात येईल.”
यावेळी राजेंद्र सुर्वे, जाकीर शेकासन, गजानन सुर्वे, सौ. वेल्हाळ, संजय अणेराव आदींनी आपले विचार मांडले.
मेळाव्यास राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे, हनीफशेठ हरचिरकर, सौ. वेल्हाळ, बाळू ढवळे, जाकीर शेकासन, गणपत चव्हाण, नाना कांगणे, मजीद नेवरेकर, तुकाराम येडगे, बाळा शेट्ये आदींसह सुमारे दोनशेहून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याचे सूत्रसंचालन संतोष बसवणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित जाधव यांनी मानले.
0 Comments