महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथील विद्यार्थिनी आरोही पालखडे हिने जलतरण क्षेत्रात आपले उत्तुंग कौशल्य दाखवत कोल्हापूर विभागीय स्तरावर भक्कम यश संपादन केले आहे. सांगली येथील शासकीय जलतरण तलावावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित कोल्हापूर विभागीय जलतरण स्पर्धेत आरोहीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
१७ वर्षे मुलींच्या गटात खेळताना आरोहीने ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि ४०० मीटर मिडले या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसह तीन महानगरपालिकांमधील नामांकित जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
आरोहीच्या या यशामुळे संपूर्ण सह्याद्री परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यालयाचा मान अधिक उंचावला आहे. तिच्या कामगिरीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत सह्याद्रीचा झेंडा खऱ्या अर्थाने अटकेपार फडकवला आहे.
या यशामागे प्रशिक्षक विनायक पवार, मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, शालेय समितीचे चेअरमन व विश्वस्त शांताराम खानविलकर, सचिव महेशजी महाडिक, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी आरोहीचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
0 Comments