वीज समस्या सोडवण्यासाठी उपअभियंत्यांचे लेखी आश्वासन
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते उपविभागातील विस्कळीत वीज पुरवठ्याविरोधात सोमवार, दि. १८ मे २०२६ पासून पुकारण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक धनाजी सावंत यांच्या मागण्यांवर महावितरणने तातडीने सकारात्मक पावले उचलत, सध्या करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित कार्यवाहीबाबत लेखी माहिती दिली आहे. महावितरणच्या या आश्वासनामुळे नातेपुते परिसरातील वीज प्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (नातेपुते-दहिगाव रोड कार्यालय) यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या पत्रात प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे:
वालचंदनगर - नातेपुते ३३ केव्ही वाहिनीचे काम लवकरच सुरू होणार
गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या वालचंदनगर ते नातेपुते ३३ केव्ही वाहिनीच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. या कामात येणारी जागेची अडचण) आता पूर्णपणे मार्गी लावण्यात आली आहे. आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता सध्या सुरू असून, संबंधित ठेकेदाराकडून हे काम अत्यंत तातडीने सुरू करून ते जलद गतीने पूर्णत्वास नेले जाईल, अशी ग्वाही महावितरणने दिली आहे.
नातेपुते शहराच्या वीज पुरवठ्याबाबत तांत्रिक सर्वेक्षण
नातेपुते शहराला सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. नातेपुते शाखा कार्यालयातील शाखा अभियंत्यांना संपूर्ण नातेपुते शहरात सर्व प्रकारचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील १० दिवसांच्या आत हा सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश असून, प्राप्त अहवालानुसार आवश्यक त्या सर्व सुधारणा व उपाययोजना तातडीने राबवल्या जातील.
ग्राहक तक्रार निवारणासाठी २४ तास ऑन-ड्यूटी ऑपरेटर उपलब्ध
नातेपुते शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्यासाठी महावितरणने विशेष संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.
महावितरणने दिलेल्या या लेखी आश्वासनांमुळे आणि वालचंदनगर-नातेपुते वाहिनीचा 'राईट ऑफ वे'चा प्रश्न सुटल्यामुळे नातेपुते परिसरातील अंतर्गत वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार आहे.
0 Comments