नैसर्गिक शेती व संतुलित खत वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महादरबार न्यूज नेटवर्क -
'खेत बचाओ अभियान' अंतर्गत मौजे पांढरेवाडी (ता. पंढरपूर) येथे शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.कार्यक्रमात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे (कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ) यांनी क्षेत्रीय प्रात्यक्षिकांद्वारे नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले. डॉ. स्वाती कदम यांनी मातीचे आरोग्य सुधारणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी शेतीतील निविष्ठांचा योग्य वापर, हिरवळीच्या खतांचा वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन (INM) याविषयी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली.
तसेच माती परीक्षण करून संतुलित खत वापराबाबत जागृती निर्माण केली.डॉ. पंकज मडावी यांनी संतुलित व हिरवळीच्या खतांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले, तर श्री. दिनेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे या बद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला.
यावेळी करकंबचे मंडळ कृषी अधिकारी श्री. सुहास यादव, उपकृषी अधिकारी श्री. सतीश कचरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रमोद डोके, श्री योगेश पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व श्री वैभव माने, श्री महेश फुले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आजी-माजी सरपंच, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी स्वयंसहाय्यता गट आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments