महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
" गझल म्हणजे प्रेम , विरह असं असताना अविनाश सांगोलेकरांच्या गझला मात्र विचारप्रवर्तक असा सामाजिक - राजकीय आशय व्यक्त करतात. त्यांचं हे वेगळेपण सुरेश भटांची गझलपरंपरा अधिक समृद्ध करेल ", अशा आशयाचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी दि (१६) रोजी काढले.ते खुटबाव येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या ' अविनाशपासष्टी ' ह्या गझलसंग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर बोलत होते.
त्याचे आयोजन मुंबई येथील ग्रंथाली आणि पुणे येथील ' माझी गझल ' ह्या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले होते. ठाणे येथील प्रसिद्ध कवी - गीतकार अरुण म्हात्रे ह्यांनी सुरेश भट , भीमराव पांचाळे ह्यांच्या मराठी गझलेतील योगदानाचा संदर्भ देत सांगोलेकरांच्या योगदानावरही प्रकाश टाकला.ते म्हणाले , " काळाच्या कसोटीवर उतरतील , असे किमान पंधरा - वीस तरी शेर सांगोलेकरांच्या ' अविनाशपासष्टी ' ह्या गझलसंग्रहात नक्कीच आहेत."
प्रारंभी ग्रंथालीच्या कार्यक्रम संय़ोजिका धनश्री धारप ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर शेवटी आभारप्रदर्शन ' माझी गझल ' चे प्रमुख , ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर ह्यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.धनंजय भिसे ह्यांनी केले.प्रकाशन समारंभानिमित्त ' अविनाशी गझल ' ह्या कार्यक्रमाद्वारे सांगोलेकरांच्या चार गझलांचे गायन आणि नृत्य ह्यांनी युक्त असे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी साताऱ्याहून आलेले प्रा.संभाजी पाटील आणि त्यांचे पुत्र दिगंत पाटील , नासिकहून आलेल्या सौ.उर्मिला मनोहर - वंजारी , अमरावतीहून आलेल्या सौ.शुभांगी पेठे ह्यांच्याबरोबरच पुण्यातील रेश्मा मुसळे परितेकर , सौ.मनाली तुंगे - झाडे , हृषीकेश तिखे आणि सुधीर टेकाळे ह्यांचा सहभाग होता.कोरोना निर्बधांच्या पार्श्वभूमीवर मोहन जोशी , रामदास फुटाणे, सौ.संगीता जोशी , सुधीर कुबेर , दीपक करंदीकर, डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी , डॉ.अविनाश आवलगावकर , डॉ.रा.गो.चवरे , डॉ.गणपतराव मिसाळ , डॉ.अनिल कांबळे, अनिल सोनवणे, विकास धुमाळ, डॉ.मल्हारी मसलखांब ह्यांच्यासह विविध क्षेत्रांमधील वेगवेगळ्या शहरांमधील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
0 Comments