#Pune:पडद्यामागचे सूत्रधार माझे 'बाबा' वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयतर्फे आगळावेगळा उपक्रम साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय नेहमीच आगळेवेगळे उपक्रम साजरे करण्यात उत्साही असते. शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा कायमच अग्रेसर असते. प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवून मुलांच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून त्या साकारून त्यातूनच भावी पिढी हुशार व सुसंस्कृत निर्माण करण्यात वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.१४) रोजी व्हॅलेंटाइन डे निमित्त शाळेमध्ये मुलांच्या बाबांविषयी असलेल्या भावना व प्रेम व्यक्त करण्यासाठी पडद्यामागचे सूत्रधार माझे 'बाबा' हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच 'बाबा', त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बाबांना विद्यालयातर्फे आमंत्रित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबांसाठी छान छान संदेश लिहिलेली भेटकार्ड, फुले, विविध वस्तू तयार करून आणल्या. बाबांविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. बाबांनीही कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आई आणि मुलांचे प्रेम तर जगजाहीरच आहे परंतु मुलांना बाबांविषयी असलेले प्रेम आणि आदर क्वचितच व्यक्त होत असतो. तो या निमित्ताने दिसून आला. यावेळी शाळेतील वातावरण आनंदी, उत्साही आणि भावुकही झाले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी कल्याण योजनेचे सचिव करंदीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आली. कार्यक्रमाची सजावट अदिती देवरुखकर, राऊत सर आणि सर्व शिक्षक यांनी केली. प्रस्तावना व स्वागत मायाताई झावरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चैत्राली म्हस्के यांनी केले व मंदाकिनी लोहार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपल्या चिमुकलांच्या बाबांविषयी असलेल्या भावना व प्रेम पाहून नकळत सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित सर्वच बाबांनी अर्थात मुलांच्या वडिलांनी शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांना धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment