#Solapur:सोलापूर सोशल फाउंडेशन चे "श्रीमंती सोलापूरची" पुरस्कार जाहीर
महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या श्रीमंती सोलापूरची या पुरस्कारांसाठी सहा जणांची निवड जाहीर करण्यात आली असून येत्या गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील ७५ गुणवंतांना या वर्षभरात श्रीमंती सोलापूरची पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला असून या पूर्वी पाच जणांना सन्मानित करण्यात आले आहे. आता अजून सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
या वेळच्या पुरस्कारांच्या मानकऱ्यांत तालवाद्य वादक नागेश रमेश भोसेकर, तरुण सुंद्रीवादक कपील विष्णू जाधव, आकाशवाणी सोलापूर केन्द्रातील अभियंता दिलीप शिवदास मिसाळ आणि पर्यावरण व वन्यजीव संरक्षक संतोष महादेव धाकपाडे यांचा समावेश आहे. सोलापूरचे ध्वनिमुद्रिका संग्राहक श्री. मोहन सोहनी आणि जयंत राळेरासकर यांना हा पुरस्कार संयुक्तपणे दिला जाणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होईल. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील तसेच तरुण भारतचे मुख्य समूह संपादक राजा माने हे उपस्थित राहतील. फाऊंडेशनचे संस्थापक मा. आ. सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तरी सोलापूरकरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.
Comments
Post a Comment