#Yavat:प्राचार्य डॉ अविनाश सांगोलेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - रमेशअप्पा थोरात
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
" प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून तो एक चमकणारा ज्ञानाच्या हिरा आहे," असे प्रतिपादन भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक व चेअरमन रमेशअप्पा थोरात ह्यांनी केले. ते (६ मे) रोजी खुटबाव येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले ," उच्च शिक्षणाचा महाविद्यालयरुपी रथ २००९ - २०१० पासून चालवत असताना आम्हांला अनेक अडचणी येत गेल्या. त्यातून २०१७ साली हे महाविद्यालय बंद पडते की काय, अशी समस्या निर्माण झाली होती. मात्र ह्या समस्येवर मात करीत २०१७ ते २०२२ ह्या कालावधीत महाविद्यालयानं आश्चर्यकारक प्रगती केली.त्याचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांना जाते." ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रसिद्ध कवी भरत दौंडकर ह्यांनी प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांचे मराठी गझलेतील योगदानावरही प्रकाश टाकला आणि त्यांची ' माणूस मारणारे ते लोक कोण होते ? ', ही प्रसिद्ध गझलही सादर केली.
केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद राजेनिंबाळकर ह्यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात खुटबावसारख्या ग्रामीण भागात सुविधा नसतानाही उच्च शिक्षणाची गंगोत्री घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशानं अप्पांनी लावलेलं हे शिक्षणरुपी रोपटं आता विस्तारलं आहे , असे विशद करून त्यासाठी प्राचार्य डॉ. सागोलेकर ह्यांचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला. ह्या वेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे नूतन सचिव सूर्यकांतकाका खैरे आणि व्हाईस चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे ह्यांनीही प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे अनेक पैलू विशद केले.
भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या सचिवपदी सूर्यकांतकाका खैरे , अरुण थोरात ह्यांची खजिनदारपदी , तर मनोज पोपटराव थोरात आणि योगेश वसंतराव थोरात ह्यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
डॉ.नंदकुमार जाधव, अनिल सोनवणे, डॉ. धनंजय भिसे ह्यांच्यासह महाविद्यालयातील काही विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षक - शिक्षकेतर ह्यांनी प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या.प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांनी आपल्या पासष्टीटीनिमित ६५ ग्रंथ महाविद्यालयास भेट दिले.त्याचा स्वीकार नूतन प्राचार्य डॉ.जगदीश औटी ह्यांनी केला.संस्थेच्या वतीने सेवापूर्तीनिमित्त प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र,पुणेरी पगडी,शाल,श्रीफळ , पोषाख आणि पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर ह्यांनी संस्था , महाविद्यालय, संस्था पदाधिकारी, शिक्षक - शिक्षकेतर , विद्यार्थी- विद्यार्थिनी, तसेच ग्रामस्थ ह्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक अरुण थोरात (सर) ह्यांनी केले, तर शेवटी आभारप्रदर्शन सा.प्रा. निखिल होले ह्यांनी केले. सूत्रसंचालन सा.प्रा . डॉ. मल्हारी मसलखांब ह्यांनी केले.
Comments
Post a Comment