#Yavat:सहजपूर व खामगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवरील ६८ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाच्या उड्डाणपूलास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी - आमदार अॅड. राहुल कुल

     
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या समतल रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे भुयारी मार्ग उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे केली होती, तसेच याकामी दिल्ली येथे वेळोवेळी पाठपुरावा केला होता याबाबत नुकतेच रेल्वेमंत्रालयाद्वारे दौंड तालुक्यातील सहजपूर व खामगाव येथे उड्डाणपूलास उभारण्यास मंजुरी देण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.    
  
सहजपूर येथील उड्डाणपुलासाठी ३४ कोटी ५ लक्ष तर खामगाव येथील उड्डाणपुलासाठी ३४ कोटी ४५  लक्ष अशा एकूण ६८ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास रेल्वेमंत्रालयाद्वारे मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 
      

                     Advertisement


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात समाविष्ट व पुण्याच्या जवळ असलेला सहजपूर व खामगाव परिसर हा अलिकडच्या काळात औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी असलेली जोडणी व या भागातील भविष्यातील औद्योगिकीकरण, वाढती जड वाहतूक व नागरीकरण लक्षात घेता सहजपूर आणि खामगाव येथे रेल्वे क्रॉसिंग ऐवजी उड्डाणपूल उभारण्यात यावेत अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी वेळोवेळी केलेली होती.       
    
यापूर्वी दौंड तालुक्यातील भांडगाव - खुटबाव, केडगाव - बोरीपार्धी - दापोडी, वरवंड - कडेठाण - हातवळण, पाटस - कानगाव, नानविज - गिरीम  व लिंगाळी - खोरवडी या सहा रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग ऐवजी भुयारी मार्ग उभारण्यात यावा यासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता त्यातील वरवंड - कडेठाण - हातवळण, पाटस - कानगाव व नानविज - गिरीम या तीन ठिकाणी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर रेल्वे भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे.    
    
खामगाव व सहजपूर येथे उभारण्यात येणारे उड्डाणपुल तसेच पुणे सोलापूर रेल्वेमार्गावर दौंड तालूक्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या भुयारी मार्गांमुळे रस्त्यांची उत्तम जोडणी होणार असून कृषी मालाची वाहतूक व दळणवळ जलदगतीने करणे शक्य होणार आहे *याचा लाभ परिसरातील शेती, उद्योगांना होणार असून, दळणवळण व  एकूण ग्रामीण अर्थकारणाला मोठा फायदा होईल असा विश्वास या परिसरातील नागरिक व शेतकरी बांधव व्यक्त करीत असून आमदार अॅड. राहुल कुल यांचे आभार देखील मानले आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर आमदार अॅड. राहुल कुल यांनी नुकतेच  (दि. २३) रोजी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आभार मानले व रेल्वे क्रॉसिंग ऐवजी उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गांसंबंधी चर्चा करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे.       
     
     
या उड्डाणपुलांच्या बांधणीसाठी सुमारे ६८ कोटी ५० लक्ष रुपये खर्च येणार असून त्याचा संपूर्ण खर्च हा रेल्वे मंत्रालय करणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या संपूर्ण खर्चातून होणारा हा तालुक्यातील पहिलाच मोठा प्रकल्प असून यापुढील काळात देखील यासाठी प्रयत्नशील राहू असे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत