#Yavat:खुटबाव येथील महाविद्यालयात पुस्तक हंडीचे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कोणालाही दहीहंडी जल्लोषात साजरी करता आली नाही. त्यामुळे तरुणाईच्या मनात काहीशी खंत होती. पण यंदा मात्र करोनाचे निर्बंध तसेच अन्य कोणत्याही निवडणुकीची कसलीही आचारसंहिता नसल्यामुळे दहीहंडीची जल्लोषात साजरी करण्याकडे तरुणाईचा कल आहे.
परंतु अलिकडच्या काळात दहीहंडीच्या निमित्ताने अभिनेत्रींना आणण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ह्या उत्सवाला काहीसे ओंगळवाणे स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसत आहे. ह्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाने पारंपरिक दहीहंडीऐवजी पुस्तकहंडी( दि १८)रोजी आयोजित केली.
पारंपरिक हंडीमध्येच संत तुकाराम, म. फुले, छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चरित्रे तसेच इंग्रजी शब्दकोश ठेवले. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींसाठी दोन वेगवेगळ्या हंड्या तयार करण्यात आल्या आणि ह्या हंड्या फोडून त्यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या ह्या आधुनिक उपक्रमाबद्दल भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री. रमेशआप्पा थोरात ह्यांनी कौतुक केले.
संस्थेचे सचिव सूर्यकांतकाका खैरे तसेच प्राचार्य डॉ. जगदीश आवटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी तांबोळी तसेच सर्व सहकाऱ्यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले.
Comments
Post a Comment