#Solapur:जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी आता दीर्घकालीन उपाययोजना करा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.14 (जिमाका): जिल्ह्यात अपघातात मरणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र याबरोबरच जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उर्वरित अपघातप्रवण क्षेत्रात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, रोहित दुधाळ यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 55 अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होते ते आता 23 वर आले आहेत. शहरातील 21 ब्लॅक स्पॉटचे 29 झाले आहेत. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी आय रॅडचा ॲपचा वापर वाढवा. अपघात हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होतात. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर सर्व विभागाची यंत्रणा 48 तासांच्या आत पोहोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात. पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही करतात. मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना त्वरित मदत पोहोचली तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणून सर्व विभागाच्या सहकार्याने यंत्रणा उभी करायला हवी. अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्यासाठी मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून काम करावे.

महामार्गावर वळणाच्या ठिकाणी आणि गतीरोधकावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावाव्या. महामार्गावर नो पार्किंग झोन, लेन बदलणेबाबत जागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. रस्ते दुरूस्ती आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होत असल्याने कामापासून दोन-तीन किमीपासूनच सूचना फलक लावावेत, असेही त्यांनी सांगितले.

साखर कारखान्यांचा गळित हंगाम सध्या सुरू होत आहे. यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर, बैलगाडी, ट्रक या वाहनांना लाल रंगाचे रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी केल्या. 
श्रीमती गायकवाड यांनी रस्ते सुरक्षेबाबतची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत