#Solapur:महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमातूनपीडितेला तातडीने न्याय देण्याची भूमिका- अध्यक्षा रूपाली चाकणकर

जनसुनावणीत 81 थेट तक्रारी प्राप्त

सोलापूरदि. 29 (जि. मा. का.) : ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमातून वर्षानुवर्षे अत्याचार, अन्यायग्रस्त पीडितेला स्थानिक पातळीवर तातडीने न्याय देण्याची आयोगाची भूमिका असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे केले. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या जनसुनावणीदरम्यान आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

नियोजन भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जिल्हा परिषद जावेद शेख, तहसीलदार अंजली मरोड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्याच्या विकासाचा आलेख महिलांच्या सुरक्षिततेवर मोजला जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे, असे सांगून रूपाली चाकणकर म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, अंधश्रद्धा, माता व बालमृत्यु अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा घटना रोखणे आपल्या सर्वांसमोर आव्हान असून, सर्वांनीच एकजुटीने त्याचा सामना करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला, मुली, तरूणी, बालिकांना महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून न्याय देण्याचा प्रयत्न असून, त्यांचा चेहऱ्यावरील आनंदात आपल्याला समाधान मिळेल, असे त्या म्हणाल्या. कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य व पोलीस यंत्रणांनी केलेल्या कामगिरीचा त्यांनी आवर्जून उल्लेख करत अभिनंदन केले.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग याद्वारे करत आहे, असे त्या म्हणाल्या.

तीन पॅनेलमध्ये जनसुनावणी घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून आज 81 थेट तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या. यामध्ये सामाजिक 11, मालमत्ता विषयक 10, कामाच्या ठिकाणी मानसिक छळ 2, कौटुंबिक 58 तक्रारींचा समावेश आहे. सदर तक्रार अर्ज संबंधित यंत्रणांकडे वर्ग करून, त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, जिल्हा परिविक्षा अधिकारी वैशाली भोसले, परिविक्षा अधिकारी सर्वश्री नितीन इरकल, नितीन जाधव, दीपक धायगुडे आदिंनी परिश्रम घेतले.

 

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम