#Solapur:जिल्हा आरोग्य विभाग गोवर संसर्गाबाबत अलर्ट
सोलापूर, दि. 02 (जि. मा. का.) :- राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवर विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
आज दुपारी आयोजित जिल्हा कृतिदल आढावा बैठकीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त् जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी सुचना केल्या आहेत कि, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे व घाबरुन न जाता गोवर टाळणेसाठी गोवर लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे. तसेच जिल्हयातील उसतोड मजूर, वीटभटृटी कामगार, वाड्या - वस्त्या इ. ठिकाणी अतिजोखमीच्या गावांतील भागांमध्ये संशयित रुग्णाचे शोध घेणे, जागतिक आरोग्य संघटना यांच्या माहितीन्वये गोवर हा हवेच्या माध्यमातून पसरतो, खोकल्याद्वारे हवेमार्फत याचा प्रसार होतो. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते सुरुवातीस ताप व खोकला त्यानंतर सर्दी, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येतात आणि ते कानाच्या मागे, चेहरा, छाती पोटावर पसरतात. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत वारंवार आढावा घेतला आहे. तसेच ते पाठपुरावादेखील करत आहेत. काही तालुक्यांचे रिपोर्टिंग प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ रिपोर्टिंग अद्ययावत करणेची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत तालुका अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या.
काय काळजी घ्यावी
बालकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अ जीवनसत्व द्यावे, बालकांचे नियमित लसीकरण करावे,गोवर संशयित रुग्णांच्या संपर्कात जाणे टाळावे. वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, पिवळी फळे, हिरव्या पालेभाज्या खाणे आवश्यक, वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो, सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांनी संशयित गोवर रुग्ण आढळून आल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, गोवर पहिला डोस व दुसरा डोस प्रलंबित असलेल्या बालकांची यादी तयार करुन अतिरिक्त लसीकरण सत्र ठेवून पूर्ण करुन ती माहिती पोर्टलला अद्ययावत करावी याकरिता शिक्षण व बालकल्याण या विभागाची मदत घेण्यात यावी. याबाबत सायंकाळी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे आरोग्य तसेच BEO व CDPO यांना संबोधित करण्यात येणार आहे.
गोवर विषाणूजन्य आजाराबाबत जन-जागरण,प्रशिक्षण,या गोष्टींवर भर देणे व ग्रामीण भागातील सर्व जनतेने गोवर विषाणूजन्य आजाराला घाबरुन न जाता, वरील जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करावे असे, आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment