#Solapur:वंचित, गोरगरीबांना आरोग्य योजनांची माहिती द्यावी - उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. राधाकृष्ण पवार


सोलापूर, दि. 7 (जि. मा. का.) : केंद्र व राज्य शासन दरवर्षी आरोग्य विषयक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करीत असते. परंतु, लोकांना या योजनांची माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनांच्या रूपाने लोकांना एक संजीवनी मिळाली आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून वंचित व गोरगरीब गरजूंना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करा, अशा सूचना उपसंचालक (आरोग्य सेवा), पुणे डॉ. राधाकृष्ण पवार यांनी केल्या.


जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. राधाकृष्ण पवार म्हणाले, आरोग्य संस्थांमध्ये व गावात दर्शनी भागात या योजनांची सविस्तर माहिती असलेले फलक लावा. गृहभेटींमध्ये लोकांना याची माहिती द्यावी. गोरगरीब व वंचितांना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करावी. लोक स्वतः योजनांचा लाभ घेण्यासाठी येतील तेव्हाच तुमचे सर्व उद्दिष्ट सहज पूर्ण होतील. लोकांना संजीवनी देण्याचे पुण्यकर्म करण्याचे भाग्य आपणास लाभले आहे या भावनेतून काम करावे, असे ते म्हणाले.

डॉ. पवार म्हणाले, संस्थात्मक प्रसुती वाढविण्यासाठी गरोदर मातांचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात शिबिरांचे आयोजन करावे. आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती देवून या सर्व सेवा त्यांना मिळतील, याचा विश्वास द्या तरच लोक सेवा घेण्यासाठी आपल्या संस्थेत येतील. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी 108 रूग्णवाहिकांची नियमितपणे तपासणी करून यातील सर्व यंत्रणा कार्यान्वित राहतील याची दक्षता घ्यावी. कुटुंब कल्याण अंतर्गत सर्व सेवांची माहिती लोकांना द्यावी. कुटुंब कल्याण साधनांचा वापर व याबाबत असलेल्या गैरसमजुती याबाबत लोकांचे समुपदेशन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

कोविड काळात इतर जिल्ह्याच्या मानाने सोयीसुविधा व मनुष्यबळ कमी असतानादेखील सोलापूर जिल्ह्याने खूप चांगले काम केले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढाव्यामध्ये सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, महुद, वळसंग जेऊर यांनी आपल्या मुख्यालयामध्ये जास्तीत प्रसुती सेवा दिल्याबदृल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच  लसीकरणामध्ये देखील सोलापूर जिल्ह्याचे काम उतकृष्ट असल्याने त्याही कामाचे कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम