#Yavat:लोककला सादर करणाऱ्याचा सन्मान व्हायचा परंतु आत्ता कलाकारांशी समाज दुजाभाव होतो - वासुदेव कलाकार अमोल कोंडे
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीत वासुदेव, पिंगळा, ज्योतिषी असे अनेक बहुरुपी लोक हि पारंपारीक लोककला जपणारे बरेच आहेत. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीपासुन अशा लोककला या समाजातील लोक आजही तेवढ्याच आवडीने जपताना दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हेही वेषांतर करण्यात पटाईत होते. व त्यांनी या बहुरुपी कलाकारांच्या माध्यमातून स्वराज्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.
पूर्वीच्या काळापासून या लोककला सादर करणाऱ्या कलाकारांना सन्मान दिला जायचा परंतु सध्या मात्र या कलाकारांशी समाज दुजाभाव करताना दिसत आहे.
साधुसंत येता घरा तोचि दिवाळी दसरा हे संतवचन जपणारा आपला हिंदू धर्म आता साधुसंत येता घरा दारे खिडक्या बंद करा अशा प्रकारे वागताना दिसत आहे.
समाजाने अशा लोक कलाकारांना माणुसकीची वागणूक दिली पाहिजे. नाहीतर भविष्यात या कलाकारांची पुढची पिढी त्यांच्या या परंपरेपासुन दूर जातील. आणि आपल्या पुढच्या पिढीला हे बहुरुपी कलाकार फक्त चित्रातच दाखवावे लागतील.
वासुदेव श्री अमोल रामदास कोंडे हे यवत येथील माणकोबावाडा येथे आले होते त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी एक खंत व्यक्त केली की, मी माझ्या रोजगाराचे साधन म्हणून या कलेकडे पाहत नाही. मी कंपनीत काम करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. परंतु माझ्या पूर्वांपर चालत आलेली ही परंपरा जपली जावी. व त्यामुळे मला माझ्या मनाला समाधान मिळते. परंतु आम्ही येताच लोकं दार खिडक्या बंद करतात. लोकं हजारो रुपये खर्च करत असतील पण आम्हाला पाच दहा रुपये देण्यास नकार देतात. व आमच्याशी पहिल्यासारखे आपुलकीने वागत नाही. माणुस आमच्याशी दुजाभावाने वागवतात. कदाचित यामुळे या पारंपारिक लोककला जपणारी आमची शेवटची पिढी असावी. आमची मुलं ही परंपरा जपतील की नाही यात शंका आहे. माणसाने आमच्याशी आपुलकीने माणुसकीच्या नात्याने वागणुक दिली तर आमची मुलेही ही परंपरा जपण्यासाठी पुढे येतील. असे मत वासुदेव कलाकार अमोल कोंडे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment